लाभार्थींना आनंदाचा शिधाचे वाटप
बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह विशेष प्रतिनिधि/ आनंदाचा शिधा, शिवभोजन लाभार्थी आणि धान उत्पादक शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधला. बुलडाणा येथून सहभागी झालेल्या लाभार्थींशी त्यांनी विविध योजनांविषयी मत जाणून घेतले.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधावस्तूचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होण्याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून लाभार्थीं सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद पाटील यांच्यासह लाभार्थी वंदना इंगळे आणि नरुल्ला खान उपस्थित होते. या संवादात मुख्यमंत्री शिंदे यांनी बुलडाणा येथील वंदना इंगळे यांना आनंदाचा शिधा आणि महिलांना देण्यात येणारा एसटी प्रवासातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेतला असल्याबद्दल विचारणा केली. तसेच नरुल्ला खान यांना आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळीबाबत माहिती विचारली. सर्वसामान्य नागरीकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लाभार्थीनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांच्या हस्ते आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.
Users Today : 6