मेहकरातील पळून गेलेल्या व्यापाऱ्यांविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधी आवाज का उठवत नाही…?
रविकांत तुपकर यांचा पत्रकार परिषदेत सवाल
बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह बुलडाणा जिल्हा विषेश प्रतिनिधि
– फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच बाजार समितीकडे तक्रार केलेली आहे. सदर व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी व त्यांची संपत्ती विकून शेतकऱ्यांना पैसे द्यावे, अशी मागणी आहे. परंतु याप्रकरणी सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांना मदत करायची सोडून रविकांत तुपकर यांना टार्गेट करून त्यांची प्रतिमा मलीन करायचा हा डाव आहे. शेतकऱ्यांमध्ये आमची वाढती लोकप्रियता आणि येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विनाकारण चुकीचे आरोप करत राजकारण करण्याचा हा डाव आहे, असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. तसेच मेहकर येथील दोन व्यापारी शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे पैसे घेऊन पसार झाले आहेत, त्यांच्या विरोधात मेहकरचे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
रविकांत तुपकर यांनी १७ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसह पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात बाजू मांडली. आरोपांचे खंडन करण्यासह खरी बाजू समोर मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. अशोक सावजी हे ज्येष्ठ विधीज्ञ आहे. त्यांच्या कार्यालयात बरेच वकील काम करतात, त्यामध्ये माझी पत्नी अॅड. शर्वरी तुपकर देखील आहे. संबंधित व्यापाऱ्याचे सासरे काही वर्षापूर्वी अॅड.सावजी यांच्याकडे कारकून होते, या संबंधातून हे व्यापारी त्यांच्याकडे गेले होते, परंतु हे प्रकरण शेतकऱ्यांचे असल्याचे लक्षात येताच आम्ही त्यांना ही केस घेऊ नये अशी विनंती केली आणि त्यांनी सदर केस परत केली आता या केसमध्ये दुसरे वकील आहेत त्यामुळे विनाकारण आमचे नाव पुढे करुन राजकारण केले जात आहे. या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा हा प्रकार सुरु आहे, असे तुपकरांनी म्हटले आहे.
शिवसेना-शिंदे गटाचे गजाननजी मोरे यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर आरोप करणारे गजाननजी मोरे यांनी त्यांच्या संस्थेत बोगस विद्यार्थी दाखवून ६५ लाखांची शिष्यवृत्ती लाटली होती. शासनाने याप्रकरणी कारवाई करुन सदर रक्कम वसूल केली आहे. २०११ मध्ये गजानन यांच्यासह संस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. राऊत नावाच्या शिक्षकाला त्यांनी काढुन टाकले होते तेव्हा त्या शिक्षकाने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने सदर शिक्षकाला शाळेत घेण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी सदर शिक्षकास पुन्हा शाळेत घेतले होते. तसेच मोरे यांनी दिवठाणा येथील ग्रामपंचायतीच्या दोन खोल्या आणि दोन एकर जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा अॅड.शर्वरी तुपकर यांनी त्यांच्या विरोधात केस लढून ग्रामपंचायतीला विजय मिळवून दिला होता, त्यामुळे मोरे यांना संस्थेसाठी दोन खोल्या आणि दोन एकर जमीन पचवता आली नाही, त्याचा राग असल्याने ते चुकीचे आरोप करीत आहेत, मुळात गजाननजी मोरे यांना आरोप करण्याचा कोणताच नैतीक अधिकार नाही, असे तुपकरांनी सांगितले. 
शिवसेना-शिंदे गटाचे दत्ताभाऊ खरात यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. दत्ताभाऊ खरात हे दरवर्षी एक पक्ष बदलतात. त्यांच्या महात्मा फुले पतसंस्थेत सर्वसामान्य शेतकरी आणि चिखलीतील नागरिक, व्यापारी यांच्या साडेचार कोटींच्या ठेवींवर त्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी १२ जुलै २०१९ रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ते जेलमध्येही होते. शेतक-यांनी त्यांच्या विरोधात आंदोलने केली आहेत, ज्याने स्वताच काळेकारनामे केले काळे झाले आहेत त्यांना इतरांवर आरोप करण्याचा अधिकार नाही, शेतकऱ्यांना फसवणाराच शेतकऱ्यांचा उसना आव दाखवत आहे, असे सांगत रविकांत तुपकर यांनी दत्ताभाऊ खरात यांचा बुरखा फाडला.
तर शिवसेना-शिंदे गटाचे शिवाजी देशमुख यांनी बाजार समितीतून हजारो क्विंटल माल नेला परंतु त्याचा हिशोब नाही, रनमोडे प्रकरणात सर्व व्यापाऱ्यांनी पोलिसांत जबाब दिला परंतु देशमुख यांनी जबाब दिला नाही . त्यामुळे त्यांचे व्यापा-यांशी साटेलोटे असल्याचे दिसून येते, तसेच गाडे प्रकरणात शिवाजी देशमुख यांचे काय व्यवहार झाले याचीही चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी तुपकरांनी केली. यावेळी ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी व पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.डॉ.रायमूलकर साहेब मग तुमचे ते जलसमाधी आंदोलन नौटंकी होते का?
आम्ही केलेल्या आंदोलनाला आ.डॉ.रायमूलकर साहेब नौटंकी म्हणतात तर दुसरीकडे पेनटाकळी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या मागणीसाठी त्यांनीही पेनटाकळीत उडी घेऊन जलसमाधी आंदोलन केले होते. परंतु त्याबाबत अद्यापही न्याय मिळाला नाही मग त्यांचेही आंदोलन नौंटकी होते का ? असा प्रश्न तुपकरांनी केला. ३० वर्षांपासून मेहकरात आमदार, खासदार सत्तेवर आहेत परंतु अद्यापही त्यांना पेनटाकळीचा हा प्रश्न सोडवता आला नाही. त्यांनी शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा, अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी कधी आंदोलन केले नाही, सभागृहात आवाज उठविला नाही आणि उलट तेच आम्हाला प्रश्न विचारतात. लोकप्रतिनिधींनी उत्तर दिले पाहीजे परंतु ते तसे करत नाही. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १७४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करुन दिली. पाच महिने त्याच्या याद्या तयार झाल्या नाही तेव्हा आमदार, खासदार बोलले नाही. आम्ही पिकविम्याचे १५९ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले अजूनही ७१ हजार शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत. आमदार, खासदारांनी शेतकऱ्यांना पिकविमा, अतिवृष्टी मिळवून देत न्याय द्यावा, मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे तफावतीचे पैसे बाकी आहेत, ते मिळवून द्यावे, असेही यावेळी तुपकरांनी म्हटले.
मेहकरातील व्यापाऱ्यांचे काय?
मेहकरातील अग्रवाल नावाचे व्यापारी अडते आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेले आहेत. त्यांच्या विरोधात साधा एफ.आय.आर. देखील झाला नाही. तेव्हा बाजार समितीचे सभापती खासदारांचे भाऊ होते. आमदार, खासदारांनी अग्रवालच्या विरोधात आवाज उठविला नाही. आजही हा अग्रवाल जालन्यात त्याचा व्यवसाय करतो परंतु त्याच्यावर कारवाई होत नाही. मेहकरातीलच आशिष ढवळे नावाचा व्यापारी दहा कोटींचा अपहार करुन पळून गेला आहे. त्याबाबतही आमदार, खासदारांनी आवाज उठविला नाही. रनमोडे प्रकरात देखील ते समोर आले नाही आणि आता मात्र आमचे नाव घुसवून राजकारण करत आहेत. सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही परंतु सोयाबीनचे भाव वाढणार अशी बातमी एल्गार मोर्चाच्या वेळी वृत्तपत्रात खासदारांनी दिली होती ते पाहून हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली नाही. त्या शेतकऱ्यांचे आज मोठे नुकसान झाले आहे. आतापासून लोकसभेची धास्ती घेऊ नका भाजपाचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जिल्ह्यात आले तेव्हा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेचा उमेदवार बदलून द्या, अशी मागणी केली होती तेव्हापासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राजू शेट्टी साहेब यांनी हातकनंगले, बुलढाणा मिळून पाच लोकसभेच्या जागा आम्ही लढणार असे जाहीर केले आहे. मी देखील आम्ही बुलढाण्याची जागा लढण्याचे जाहीर केल्यापासून आमची प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु त्यांनी आतापासून लोकसभेची धास्ती घेऊ नये, मी फार छोटा कार्यकर्ता आहे, असे तुपकरांनी म्हटले आहे.
*तुपकरांवर चुकीचे आरोप- पिडीत शेतकरी*
राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करु नये, शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांवरुन चुकीचे राजकारण केले जात आहे. रविकांत तुपकर यांच्यावर या प्रकरणी चुकीचे आरोप होत असून तुपकरांच्या बाबतीत शेतकऱ्यांची कोणतीच तक्रार नाही. आम्ही शेतकरी रविकांत तुपकरांसोबत आहोत. संबंधित व्यापाऱ्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र यावे, अशा भावना यावेळी काही पिडीत शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
Users Today : 9