बुलडाणा, दि. 27 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी, दि. 26 एप्रिल रोजी अवैध दारूविक्रीविरूद्ध 12 गुन्हे नोंद केले. सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी, दि. 25 एप्रिल रोजी अवैध हातभट्टीवर कारवाई करून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत् 12 वारस गुन्हे नोंदवून 12 आरोपींसह हातभट्टी 228 लिटर, रसायन 5 हजार 156 लिटर, देशी मद्य .90 लिटर, विदेशी मद्य 1.24, असा 2 लाख 8 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध मद्य विक्री करणाऱ्या चिखली तालुक्यातील सावखेड भोई येथील आशिर्वाद ढाबा आणि अशोका ढाबा येथे मद्यसेवन करणाऱ्या दोन ढाबा मालक आणि सहा ग्राहकांवर म. दा. का. १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार कार्यवाही करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ एप्रिल २०२३ ते दि. 27 एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण 101 गुन्हे नोंदवून 97 आरोपी आणि ५ वाहनासह बिअर ८७ लिटर, देशी मद्य ३८५ लिटर, हातभट्टी 947 लिटर, विदेशी मद्य १३७ लिटर आणि सडवा 22 हजार 481 लिटर असा 13 लाख 48 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ वर किंवा व्हॉटॲप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.
जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञाप्तीधारक यांच्या अनुज्ञाप्तीमध्ये बनावट मद्य आढळुन आल्यास त्यांची अनुज्ञाप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.
00000
टपाल जीवन विमा योजनेसाठी एजंट भरती
*इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 27 : महाराष्ट्र आणि गोवा राज्यात टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह दि. 10 मे 2023 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत डाकघर कार्यालयात उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.एजंटसाठी वय वर्षे 18 ते 50 दरम्यान असावे, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी, बेरोजगारीत किंवा स्वयम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत्त शिक्षक व इतर उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञानाच्या आधारावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारास राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अथवा किसान विकास पत्रच्या स्वरुपात पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल.प्रशिक्षण पूर्ततेनंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायम परवान्यामध्ये रुपांतरीत केला जाईल. नियुक्तीनंतर आयआरडीएची परवाना परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहिल. दहावी किंवा बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड झेरॉक्स, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र अर्जासह असणे आवश्यक आहे.निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाईल.
Users Today : 16