गांगलगावच्या ‘धनीक’ जुगारावर छापा : १० धनाढ्य जुगाऱ्यांना पकडले.. दोन आलीशान गाड्यांसह दहा दुचाकी जप्त : डीवायएसपी विवेक पाटील यांची धाडसी कारवाई , स्थानिक पोलीस स्टेशनला याची माहिती नव्हती का..?

Khozmaster
2 Min Read

चिखली महेंद्र हिवाळे

……………….

तालुक्यातील गांगलगावच्या निसर्गरम्य रानात खुलेआम सुरू असलेल्या तगड्या जुगार अड्ड्यावर अखेर पोलिसांची नजर पडलीच! कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या या जुगारावर परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी धाडसी कारवाईचे ‘धाडस’ केले. डीवायएसपींच्या पथकाने बुधवारी सायंकाळी जुगारावर धाड घालून १० ते १२ धनाढ्य जुगाऱ्यांना पकडले. तर १० ते १५ जण फरार होण्यात यशस्वी झाले.

दोन आलीशान चारचाकी गाड्या आणि दहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी लाखोंची रोकड जप्त केली असून, येथे २० ते २५ लाख रुपयांतपर्यंतचा आजचा डाव बसल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू असल्याचे डीवायएसपी विवेक पाटील यांनी ‘दूरध्वनी वरून बोलताना सांगितले.

गांगलगाव परिसरात साई बाबांचे मंदिर असून त्या मंदिरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावरच हा जुगार अड्डा थाटण्यात आला होता. निसर्गरम्य वातावरण, पेरूचा बगीचा असे हे पोषक ठिकाण होते. या जुगारावर डीवायएसपी विवेक पाटील यांनी बुधवारी धाड घातली. अंढेऱ्याचे ठाणेदार हिवरकर यांना आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर उघड्यावर सुरू असलेल्या या जुगार बद्दल विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

 

जुगाऱ्यांची शाही बडदास्त

विशेष म्हणजे येथे पत्त्याचा जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या जुगाऱ्यांची अगदी राजेशाही बडदास्त ठेवण्यात येत होती. त्यांना काहीही कमी पडू नये याची विशेष काळजी घेण्यात यायची. त्यामुळेच अगदी भजे, जिलेबीपासून तर काजू बदाम पिस्ता, मिनरल वॉटर आणि गुटख्यापासून ते मद्यमानाची सगळी व्यवस्था जागेवरच उपलब्ध करून देण्यात येत होती.

 

व्याजाने पैसे देण्यासाठी सावकारही हजर!

या ठिकाणी जुगार खेळताना पैशांची अडचण येऊ नये म्हणून सावकार नगदी व्याजाने पैसे देण्यासाठी तत्पर सेवा देत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दहा हजाराला पाचशे रुपये रोज या भावाने सावकारीचे पैसे दिले जातात. जुगाऱ्यांना जुगार खेळताना दुपारी झोप येऊ नये म्हणून गुळाचा चहाही दिमतीला हजर असतो, असे सूत्रांनी सांगितले. चिखली तालुक्यामध्ये याप्रमाणेच वरली मटका व अवैध देशी दारूचे धंदे जोरात सुरू आहेत याकडे सुद्धा उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील लक्ष देतील का अशी चर्चा आता लोकांमधून येत आहे.

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *