नंदुरबार पोलीसांनी आणखी तीन बालविवाह रोखले…

Khozmaster
3 Min Read

प्रविण चव्हाण

नंदुरबार -: दिनांक 04 मे रोजी विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना स्थानिक नागरिकांकडून गुप्त माहिती मिळाली की, विसरवाडी गावात दोन व अक्कलकुवा तालुक्यातील बेटी गावातील एका अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबिय नियोजन करीत असल्याची माहिती मिळाली.

सदर घटनेची माहिती विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना कळविल्याने त्यांनी सदरचे बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करणे बाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्यांनी तात्काळ माहिती काढली असता, विसरवाडी गावातील एका अल्पवयीन मुलींचा विवाह साक्री व एका अल्पवयीन मुलीचा विवाह नंदुरबार येथील तरुणांसोबत निश्चित करण्यात आला होता, परंतु विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तेथे दोन्ही अल्पवयीन मुलींच्या घरी जावून अल्पवयीन मुलींच्या कुटुंबीयांचे व त्यांच्या समाजाचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच दोन्ही अल्पवयीन मुलीच्या पालकांना विसरवाडी पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलींचे वय (18) वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

तसेच दिनांक 04 मे रोजी अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील बेटी या गावात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी जावून माहिती घेतली असता बेटी गावातील अल्पवयीन मुलीचा होराफळी गावातील तरुणा सोबत विवाह निश्चित करण्यात आला होता. अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना तसेच हजर असलेले गावकरी यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय ( 18) वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी तीन दिवसात पाचवा बालविवाह रोखल्याने नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल तसेच आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींपैकी 615 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत.

तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील, असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक. पी.आर.पाटील यांनी सांगितले.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा प्रमुख पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील, बेटी गावाचे पोलीस पाटील, सुरेश वसावे, होराफळीचे पेालीस पाटील दारासिंग वळवी यांनी केली आहे.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *