बुलडाणा, दि. 10 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 25 एप्रिल ते 5 मे 2023 दरम्यान आयोजित विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप करण्यात आला.
यावेळी आमदार संजय गायकवाड, तहसिलदार रुपेश खंडारे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सुधाकर अहेर, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष राजू पाटील, डॉ. अश्विनी जाधव चिखलकर, राजेश डिडोळकर आदी उपस्थित होते.
आमदार श्री. गायकवाड यांनी क्रीडाविषयक सुविधेची माहिती सांगितली. खेळामुळे राज्य शासनासह केंद्रात ही नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध होते, तसेच येत्या काळात जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटरचा सिंथेटीक धावपथ, इनडोअर व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, स्केटींग आदी क्रीडा सुविधांची निर्मिती होणार असल्याचे सांगितले. श्री. खंडारे यांनी मोबाईल, टीव्हीचे दुष्परिणाम सांगून पाल्यांना खेळाकडे वळविण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी विविध खेळांत आत्मसात केलेल्या प्रशिक्षणाचे कौशल्य सादर केले. कार्यक्रमात जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त तथा सहभाग खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात 110 मीटर हर्डल्स तामिलनाडू येथील तिरुमलाई राष्ट्रीयस्तर गोल्ड मेडल नयन सरडे, राज्यस्तरीय खेळाडू सिद्धी डिडोळकर, पुनम बंगाळे, प्रणव राजू सोनुने, यशराज राजपूत, स्वरुप सराफ, वैष्णवी चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. शिबिरातील प्रशिक्षक सुनिल जोशी, मनोज श्रीवास, विजय वानखेडे, डॉ. प्रा. बाबाराव सांगळे, राहुल औशलकर, निलेश शिंदे, गजानन घिरके, शशीकांत पवार, संजय चितळे, मोहम्मद सुफीयान, प्रा. विद्या साळवे वानखेडे, विभा जोशी, हर्षल काळवाघे, दिपक जाधव, भुषण शिरसाठ, सुहास राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
सदर शिबीराचे आयोजन व नियोजन मा.श्री.गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्री.अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा शिबीर प्रमुख यांनी उत्कृष्टपणे केले त्याबद्दल प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. शिबीरासाठी वरिष्ठ लिपिक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, भीमराव पवार, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी पुढाकार घेतला.
Users Today : 19