बुलडाणा, दि. 10 : महिला लोकशाही दिनाच्या अनुषंगाने दि. 12 ते 31 मे 2023 या कालावधीत प्रत्येक तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला यात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
तालुका, जिल्हा, विभागीय आणि मंत्रालयीनस्तरावर महिला लोकशाही दिन हा अनुक्रमे प्रत्येक महिन्याचा चौथा, तिसरा, दुसऱ्या सोमवारी घेण्यात येतो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो.
राज्य् घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपिठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यासाठी महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी आणि समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन सादर करण्यात येतो.
शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीरामध्ये महिलांनी सहभागी होऊन शासकीय कार्यालयाशी संबंधित तक्रारी असल्यास तालुकास्तरावर तहसिलदार आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे.
Users Today : 19