बुलढाणा दि.13
बालवाचन चळवळीचे प्रणेते प्रयोगशील ग्रंथपाल स्व. नरेंद्र लांजेवार यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरात सुरू करण्यात आलेल्या पुस्तक मैत्री बाल वाचनालय चळवळीच्या अंतर्गत त्यांच्याच जयंतीच्या पर्वावर बजरंग नगर सागवन एरियातील बालवाचक सौरभ तायडे याचे निवासस्थानी पुस्तक मैत्री बाल वाचनालयाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उर्दू शायर गझलकार कवी डॉ. गणेश गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. कि.वा. वाघ, अमरचंद कोठारी, प्रज्ञा लांजेवार, स्वाती कन्हेर, डॉ. विजयाताई काकडे, शहीनाताई पठाण, पंजाबराव गायकवाड, युवराज कापरे यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. गणेश गायकवाड म्हणाले की, स्व. नरेंद्र लांजेवार यांनी बीज रुजवत केलेली बालवाचनालयाची चळवळ पुढे घेऊन जात आहोत ही सध्याच्या काळातील फार महत्त्वाची बाब आहे. मोबाईल, इंटरनेट, टीव्हीचा वापर वाढत असतांना बालकांनी पुस्तके वाचली पाहिजे हे महत्त्वाचे व चांगले काम आहे. पुस्तकासारखे दुसरे मित्रच असू शकत नाही. पुस्तके जीवनाला बळ देतात. वाचनाने विचारांना चालना मिळते. वाचनाच्या माध्यमातून शिकत असताना मेंदूला चालना मिळते. वाचनाने जीवनात अडचण येणार नाही .पुस्तकांनी विचारांना सकारात्मकता मिळते. पुस्तकांशी झालेली मैत्री जीवन सुकर बनवण्यासाठी महत्त्वा्ची भूमिका बजावत असतात असे मत बाल वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. गणेश गायकवाड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना स्वाती कन्हेर यांनी बालकांनी वाचन करतानाच आपल्या नोंदी काढून त्याची वही तयार करावी. यातूनच नवीन समीक्षक तयार होतील. श्यामची आई हे पुस्तक महाराष्ट्रातील घराघरात पोहोचावे यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. वाचनालयाच्या उद्घाटना निमित्त स्वाती कन्हेर यांनी पाच हजार रुपयाची पुस्तके बाल वाचनालयाला भेट दिली.पंजाबराव गायकवाड, प्रज्ञा लांजेवार व डॉ. विजयाताई काकडे यांनी देखील बाल वाचनालयासाठी पुस्तके भेट दिली. शहिनाताई पठाण बोलतांना म्हणाल्या की सध्याच्या काळात मुलांसाठी बाल लेखकांनी आता वेगळे लिहिण्याची गरज आहे. आताची पिढी वास्तवावर विश्वास ठेवणारी असल्यामुळे विज्ञानवादी लेखन बालवाचकांसाठी असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. कि.वा. वाघ बोलतांना म्हणाले की माणसाला माणसापासून दूर नेण्याचे काम मोबाईल सह इतर माध्यम करत आहेत. आभासी जगाची माहिती करण्यासाठी पुस्तकांची वाचन करण्याची आवड निर्माण व्हावी व या माध्यमातून मराठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे. यासाठी बाल वाचनालयाची गरज त्यांनी अधोरेखित केली. याप्रसंगी पंजाबराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कवी अमरचंद कोठारी यांनी बालकविता सादर करून बालकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रविकिरण टाकळकर यांनी पुस्तक मैत्री बालवाचनालय चळवळीच्या व वाचन संस्कृतीच्या अभिनव प्रयोगाची माहिती दिली.या वाचनालयाचे व्यवस्थापन बालक करतात.बालकांनी बालकांसाठी चालविलेल्या या उपक्रमाची दखल महाराष्ट्रभर घेतल्या गेल्याचे टाकळकर यांनी सांगीतले. यावेळी क्षितिजा इंगळे ,हर्षल चवटकार, जानवी चवटकार, तेजस इंगळे, तृप्ती इंगळे या बालवाचकांनी श्लोक व गीते सादर केली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ.सुप्रिया वाघमारे, अनिता कापरे ,नीतू साळवे,मैत्री लांजेवार यांच्यासह परिसरातील बालवाचकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती तायडे हिने तर आभार प्रदर्शन वैशाली तायडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दिलीप तायडे,.वाडेकर वेदांत,पाठक मॅडम यांनी पुढाकार घेतला.
Users Today : 20