बुलडाणा, दि. 8 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अनुसूचित जाती उपयोजना क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत विविध अनुदानित शाळा, क्रीडा संस्था यांना विविध पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यात येते. यासाठी दि. 22 ऑगस्ट पूर्वी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेतून क्रीडांगण समपातळीत करणे, क्रीडांगणावर 200 मीटर, 400 मीटर धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणाभोवती भिंती, तारेचे कंपाऊंड बांधणे, क्रीडांगणावर विविध खेळांची प्रमाणित आकारांची मैदान तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे, क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणावर भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा तयार करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर माती, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे यासाठी सात लाख रुपयांपर्यंत अंदाजपत्रक आणि दरपत्रकाच्या अनुषंगाने मंजूर करण्यात येते.
अनुदान घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजित केलेली जागा शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीत असणे आवश्यक आहे, तसे प्रस्तावासोबत गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरी, शिक्यानिशी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच संस्थेच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे. अनुदानाकरिता पात्र संस्थांचा प्राथम्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह तसेच क्रीडा विभागाची संकुले, पोलीस विभागांतर्गत कल्याण निधी समिती, शासकीय स्पोर्ट क्लब, शासकीय महाविद्यालये, शिक्षण विभागाच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये राहणार आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेच्या अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी दि. 18 ऑगस्ट 2023पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून विहित नमुना प्राप्त करुन, आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 22 ऑगस्ट 2023पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
Users Today : 47