प्रविण चव्हाण नंदुरबार :- बटेसिंगभैय्या रघुवंशी यांची धुळे, नंदुरबार,जळगाव जिल्ह्यात राजकीय नाळ जुळली होती. त्यांचे कार्य नंदुरबार पुरता मर्यादित न राहता सर्वत्र पोहोचावे यासाठी प्रयत्न करावेत. राजकीय,शैक्षणिक सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी आणि सर्व समाजाच्या विकासासाठी बटेसिंगभैय्या रघुवंशी यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले.
नंदुरबार येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी सकाळी विविध संस्थांची सर्वसाधारण सभा घेण्यात आली त्याप्रसंगी मंत्री पाटील यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,आ.राजेश पाडवी,आ.शिरीषकुमार नाईक,आ. किशोर दराडे, उद्योजक मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प सदस्य विजय पराडके,धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, नाशिक मनपाचे माजी सभापती गीते, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी, जि.प सदस्य देवमन पवार, शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील,संचालक सुरेश शिंत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले, भविष्यात नंदुरबार जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत काही दुर्घटना घडल्यास त्या परिस्थितीशी सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून मदत व पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे.
पाणीपुरवठा योजनेत लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे ; मंत्री गुलाबराव पाटील
यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, हर घर नल योजना साकार करण्यासाठी केंद्र व राज्य आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून राज्यात 37 हजार गावांना पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. नंदुरबार जिल्ह्यात ज्या गावांनी पाणी योजनेची मागणी केली त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात हर घर नल पाणीपुरवठा योजनेचे धीम्या गतीने काम सुरू असून, लोकप्रतिनिधींनी तालुका स्तरावर लक्ष दिल्यास २०२४ पर्यंत प्रत्येक घराला पाणी पुरवण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल.
नंदनगरीत औद्योगिक प्रकल्पाच्या मानस ; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
गेल्या ४० वर्षांपासून पालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे. नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी केली. गुवाहाटी येथील औद्योगिक प्रकल्प नंदुरबारला आणण्याच्या मानस असून, त्या माध्यमातून भविष्यात साधारणता पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
Users Today : 59