मोठी बातमी: बार, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मद्याचे दर वाढणार; राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ

Khozmaster
2 Min Read

राज्य  सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. सरकारने शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. बारमधील मद्यदरात वाढ होणार असली तरी स्टार हॉटेल्समधील मद्याच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण तेथील व्हॅट आधीपासूनच २० टक्के इतका आहे.सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्यानंतर बारचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने आधीच अबकारी परवाना शुल्क वाढवल्याने व्यावसायावर ताण आलेला असताना आता व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने मद्याचे दर वाढणार असून याचा व्यावसायावर परिणाम होणार आहे, असं बारचालकांचं म्हणणं आहे. एकीकडे पर्यटन आणि महसूलवाढीसाठी सर्व राज्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्याने आपल्या उद्दिष्टांना धक्का पोहोचणार असल्याचं मतही बारचालकांनी व्यक्त केलं आहे.सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रया देताना पश्चिम भारत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे प्रमुख प्रदीप शेट्टी यांनी म्हटलं आहे की, ‘व्हॅटमध्ये वाढ करण्याचा सरकारचा निर्णय अनपेक्षित आहे. आधीच अबकारी परवाना शुल्कात वाढ करण्यात आलेली असताना आता व्हॅटमध्येही वाढ झाल्याने रेस्टॉरंट आणि बारमध्ये मद्याचे दर वाढतील. आपण अशा युगात आहोत जिथे इतर राज्य स्पर्धा करत आहेत, अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये पर्यटनाची शक्ती ओळखून उत्पादन शुल्क कमी केले जात आहे. गोवा, चंदीगड आणि हरियाणा ही अशी काही उदाहरणे आहेत,’ असं प्रदीप शेट्टी म्हणाले.दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा रेस्टॉरंटवर मोठा परिणाम होणार असून यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारावरही विपरीत परिणाम होईल, असं आहार संघटनेचे प्रमुख सुकेश शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *