जऊळका, दि. ३ (प्रतिनिधी):
दुसरबीड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जऊळका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचे नाव तालुक्यात उज्वल झाले आहे.
गटशिक्षणाधिकारी स्वप्निल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या प्रांगणात ३१ जानेवारी रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ गावडे होते.
या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी धावणे, कबड्डी, खो-खो आदी क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जांभोरा केंद्र प्रमुख विलास आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील अनेक शाळांचे संघ उपस्थित होते.
स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा जऊळका येथील विद्यार्थिनी कार्तिकी योगेश कुडे हिने २०० मीटर धावणे प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
तसेच ४०० मीटर रिले स्पर्धेसाठी हर्षदा रामेश्वर सांगळे यांची निवड झाली. खो-खो स्पर्धेसाठी समर्थ वाघ, विश्वजीत वाघ, आदित्य ढाकणे, प्रशांत बोरुडे, शिवराज मानवतकर, आर्यन पव्हरे तसेच जि. प. उच्च प्राथमिक शाळा केशव शिवणीतील मुलांची निवड झाली आहे.
सहा ते आठ वयोगटातील खो-खो मुलींच्या संघात संजीवनी आढाव, शिवानी सांगळे, भावना साळवे, समृद्धी बुधवत, अंजली कुडे, अमृता बुधवत, कार्तिकी कुडे व हर्षदा सांगळे यांची जिल्हास्तरीय निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक आली पागोरे, भोकरे, नेटके आदींनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Users Today : 8