मलकापूर, दि. ३ (प्रतिनिधी):
विवरा येथील शेतकऱ्यांचा पारंपरिक वहिवाटीचा शेतरस्ता खासगी कल्पा पॉवर कंपनीने अडविल्याच्या निषेधार्थ पाच शेतकऱ्यांनी मागील नऊ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आंदोलनाच्या तीव्रतेनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय झालेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
न्याय मिळावा या मागणीसाठी शेतकरी महिलांनी मागील पाच दिवसांपासून तहसीलदारांच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, ते आंदोलन अद्याप कायम आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
गाव नकाशावर स्पष्टपणे नोंद असलेला आणि दोन गावांना जोडणारा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता नियमानुसार उपलब्ध असताना, त्या रस्त्यावर कल्पा पॉवर कंपनीने अनधिकृत काम करून अतिक्रमण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, सदर अतिक्रमण प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीचे आदेश व परिपत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार समाधान सोनवणे यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, असा सवाल शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
संसार बाजूला ठेवून न्यायासाठी संघर्ष
संसाराचा उभा गाडा बाजूला ठेवून हक्काच्या शेतरस्त्यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या केबिनसमोर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. खासगी कंपनी परस्पर नकाशावरील जुना रस्ता अतिक्रमित करून तो कायमचा बंद करत असताना प्रशासन हतबल भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लोकशाहीत पुन्हा “कंपनी सरकार” जन्माला आले का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
दरम्यान, नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले शेतकरी सीताराम बळीराम ढोण यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून, प्रशासनाकडून कोणतीही वैद्यकीय किंवा प्रशासकीय दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.
आंदोलनात सहभागी महिला शेतकरी
या आंदोलनात सहभागी महिला शेतकऱ्यांमध्ये अनिता रमेश बोदडे, कमलबाई रामचंद्र संबारे, सविता विनोद सरोदे, मंदाबाई ज्ञानेश्वर संबारे, सुमन सीताराम ढोण, नंदाबाई भागवत संबारे, हर्षा सुरेश चौधरी, प्रभावती भाऊराव तायडे, कल्पनाबाई हरिचंद्र संबारे व उषाबाई संजू कडू यांचा समावेश आहे.
Users Today : 8