जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून रस्ते अपघातात वाढ झाली आहे. या अपघातामध्ये मुख्यतः दुचाकी अपघातांचा समावेश आहे. बुलढाणा खामगाव (बोथा) मार्गावरील भादोला नजीक पोखरी फाट्यावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार झाले. ही घटना आज १४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, बब्बु शेख मुंसी (५५), हमिदाबी शेख बब्बु (५०), फिरदोस अंजुम शेख नदीम (२२) अशी मृतकांची नावे असून ते भादोला येथील राहणारे आहेत. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात पाच वर्षांचा बालक सुखरूप बचावला. प्राथमिक माहितीनुसार, शेख परिवारातील चौघे दुचाकीने बुलढाण्यावरून भादोल्याकडे जात होते. दरम्यान बोथा मार्गावरील मोरे पेट्रोल पंपानजीकच्या पोखरी फाट्याजवळ बुलडाण्याकडून खामगावकडे जाणाऱ्या एका आयशर वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यानंतर चालक वाहनासह घटनास्थळाहून फरार झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील बब्बु शेख मुंसी आणि त्यांची पत्नी हमिदाबी शेख बब्बु यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.फिरदोस अंजुम शेख नदीम यांचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर अपघातात वाचलेल्या शेख नमीर याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका कुटुंबातील एकूण चार जणांचा या अपघातात समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले असून पोलीस कारवाई सुरु आहे.