बुलढाणा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा; अप्पर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या नावे पेन्शन सुरू करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अप्पर कोषागार अधिकाऱ्यासह तिघांना Maharashtra Anti Corruption Bureau (एसीबी) च्या पथकाने शुक्रवारी, दि. २७ फेब्रुवारी रोजी रंगेहात पकडले. जिल्हा कोषागार कार्यालयातील या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
प्रवीण मोंढे – अप्पर कोषागार अधिकारी
विनोद घट्टे – कनिष्ठ लेखापाल
जीवन काळे – कनिष्ठ लिपिक
प्रकरणाचा तपशील
शेगाव येथील पोलीस दलातील एक कर्मचारी मे २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. मे २०२५ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावे पेन्शन सुरू करण्यासाठी मुलाने ऑक्टोबर २०२५ मध्ये अर्ज केला होता. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून विविध त्रुटी काढण्याच्या कारणावरून पेन्शनची फाईल प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
ही केस मंजूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. २६ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम स्वीकारताना तिघांनाही एसीबी पथकाने ताब्यात घेतले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले, रमेश पवार व त्यांच्या पथकाने पार पाडली.

0 9 3 6 2 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *