जालना :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारनं ओबीसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. राजकीय नेत्यांनी जीआर घेऊनच गावात प्रवेश करावा, असं जरांगे म्हणाले. सरकारनं जर २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर २५ तारखेपासून माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून २५ तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. त्या उपोषणात उपचार घेतले जाणार नाहीत, वैद्यकीय सेवा घेणार नाही, पाणी घेणार नाही, अन्न घेणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून कठोर उपोषण २५ तारखेपासून सुरु केलं जाणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
राजकीय नेत्यांना गावबंदी
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात एकाही महाराष्ट्रातील एकाही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावाच्या हद्दीपर्यंतही येऊ देणार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण, सगळ्या गावात उपोषण होतील. महाराष्ट्रातील गावा गावात साखळी उपोषणं सुरु केली जाणार आहेत. २८ तारखेपासून साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होईल, असं देखील जरांगे म्हणाले.
सगळ्या गावात सर्कलच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावाच्या ठिकाणी कायमस्वरुपी बसून राहायचं आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येनं मराठा समाजानं एकत्र येऊन सरकारला जागं करण्यासाठी कँडल मार्च काढायचे आहेत असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पुढे म्हणाले की ही दिशा आणि हे शांततेचं आंदोलन सुरु झाल्यानंतर सरकारला ते झेपणार नाही. २५ तारखेनंतर ते सरकारला झेपणार नाही. दोन टप्पे पाडल्याशिवाय मराठा समजाला न्याय मिळत नाही. मात्र, सरकारनं ही गोष्ट गांभीर्यानं घ्यावी, हे होणारं आमरण उपोषण आणि होणारे साखळी उपोषण महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे चालवणार आहेत. मराठ्यांचा आरक्षणाचा विषय मिटवा, २५ तारखेला २८ च्या उपोषणाबाबत दिशा सांगितली जाणार आहे ती तुम्हाला पेलणार नाही, असा इशारा जरांगे यांनी सरकाला दिला.
तुम्हाला ऐकताना हे सहज दिसत असेल, पण हे शांततेचं युद्ध होणार आहे. हे तुम्हाला झेपणार नाही. या विषयाची तुम्ही गांभीर्यानं दखल घ्या आणि मराठा समाजाला २४ तारखेच्या आत आरक्षण जाहीर करा, असंही ते म्हणाले.