धरमशाला:विश्वचषक २०२३ मधील अपराजित आणि गुणतालिकेतील अव्वल असलेल्या भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये एक अटीतटीचा सामना धरमशालामध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात २ बदल करण्यात आले आहेत. विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंत संघाबाहेर असलेल्या सूर्यकुमार आणि मोहम्मद शमी यांना या सामन्यात संधी मिळाली आहे. शार्दूल ठाकूरच्या जागी आजच्या सामन्यात मोहम्मद शमीला संधी मिळाली आणि मोहम्मद शमीने या संधीचं सोनं केलं.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीने भारताकडून गोलंदाजी आक्रमण सुरु केले. चौथ्या षटकात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर डेव्होन कॉन्वे बाद झाला. श्रेयस अय्यरने शानदार झेल टिपत कॉन्वेला डकवर बाद केले. या दोन्ही गोलंदाजांनी ४-४ षटके टाकल्यानंतर नवव्या षटकात अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आक्रमणावर आला. मोहम्मद शमीचा चेंडू किती कमाल सीम होतो, हे नव्याने सांगायची गरज नाही आणि शमीने त्याच्या याच जादुई गोलंदाजीच्या जोरावर पहिल्याच चेंडूवर किवी संघाचा सलामीवीर विल यंग याला १७ धावांवर थेट क्लीन बोल्ड केले. यंगच्या बॅटला लागून चेंडू एक्सट्रा बाऊन्स झाला आणि थेट त्रिफळा उडवला.