आचरेकर गुरुजींचे दत्तकपुत्र, माजी रणजीपटू नरेश चुरी यांचे निधन, शिवाजी पार्कातील कर्मभूमीतच अखेरचा श्वास

Khozmaster
2 Min Read

मुंबई : मुंबईत राहणारे माजी रणजीपटू नरेश चुरी यांचे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे ते दत्तकपुत्र होते.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील रहिवासी असलेल्या नरेश चुरी यांना शिवाजी पार्क जिमखान्याजवळील सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.

रमाकांत आचरेकर यांचे दत्तक पुत्र

नरेश चुरी यांना वयाच्या १३ व्या वर्षी दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी दत्तक घेतले होते. पाच मुलींच्या पित्याने नरेश यांचं पालकत्व स्वीकारत त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला नवीन आयाम दिला. तेव्हापासून दोघंही एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले होते. आपल्या सर्व शिष्यांना एकत्रित भेटण्याची आचरेकर गुरुजींची इच्छा नरेश यांनी पूर्ण केली होती. आचरेकरांच्या अखेरच्या काळात त्यांनी साथ दिली होती. आचरेकरांनी सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित यांच्यासारखे दिग्गज घडवले आहेत.

नरेश चुरी यांची कारकीर्द

नरेश चुरी रेल्वे संघातर्फे रणजीच्या मैदानात उतरले. त्यांनी १९८२-८३ ते १९८८-८९ या काळात २६ प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये ३२.६६ च्या सरासरीने त्यांनी दोन शतकांसह सात अर्धशतके लगावत १५०१ धावा ठोकल्या होत्यानरेश चुरी यांनी सात ए लिस्ट सामन्यांमध्ये २०० धावा केल्या. १९८७-८८ च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यांनी तमिळनाडू विरुद्ध शतक (११२) लगावले होते, मात्र रेल्वेने एका डावाने सामना गमावला होता. त्यानंतर १९८८-८९ च्या इराणी चषकात तमिळनाडू संघाविरुद्धच त्यांनी शेष भारताचे प्रतिनिधित्व केले होते.चुरी ससानियन क्रिकेट क्लबसाठी खेळले. नंतर स्थानिक क्रिकेटमध्ये शिवाजी पार्क यंगस्टर्स आणि आरसीएफसाठी, तसेच टाइम्स शील्डमध्ये पश्चिम रेल्वे आणि ऑल इंडिया रेल्वेसाठी खेळले. नरेश चुरी हे १९९९ मध्ये शारदाश्रम विद्यामंदिर येथे क्रिकेट प्रशिक्षक झाले. त्यांनी दीर्घकाळ प्रशिक्षकाची भूमिका बजावली. शिवाजी पार्क जिमखान्यातही ते प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *