मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम होत आहे. या स्पर्धेत भारत आतापर्यंत पाच सामने खेळला असून पाचही सामने जिंकला आहे. भारत वगळता कोणताही संघ या स्पर्धेत अपराजित नाही. ५ सामन्यांनंतर १० गुणांसह संघ भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध रविवारी होईल. त्याआधी हार्दिक पांड्याच्या फिटनेसबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध २९ ऑक्टोबरला होईल. हार्दिकला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी १० दिवसांचा अवधी मिळाला आहे. पण तरीही तो इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकची दुखापत गंभीर नाही. पण टीम व्यवस्थापन धोका पत्करु इच्छित नाही. त्यामुळे त्याला दुखापतीतून बरं होण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल.हार्दिक पांड्या संघात सहावा गोलंदाज म्हणून प्रभावी कामगिरी करतो. तो संघात नसल्यास पाच मुख्य गोलंदाजांवर पूर्णपणे भार पडतो. एखाद्या प्रमुख गोलंदाजावर प्रतिस्पर्धी फलंदाज तुटून पडल्यास कर्णधार त्याची गोलंदाजी थांबवून हार्दिकला गोलंदाजीची संधी देतो. गेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कुलदीप यादवविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. पण संघात पाचच गोलंदाज असल्यानं रोहितला त्याच्याकडून १० षटकं टाकून घ्यावी लागली.
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली. पण विराट कोहली आणि यादव यांच्यातला ताळमेळ चुकल्यानं सूर्यकुमार स्वस्तात माघारी परतला. तो धावबाद झाला. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. यंदाच्या स्पर्धेत पहिलाच सामना खेळणाऱ्या शमीनं संधीचं अक्षरश: सोनं केलं. त्यानं किवींचा निम्मा संघ गारद केला. त्यांच्या धावसंख्येला लगाम घातला. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला पुन्हा संधी मिळू शकते.