म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: पीएचडी शोध प्रबंधातील ५० टक्क्यांहून अधिक मजकूर अन्न शोध प्रबंधातून घेतल्याचे तपासाअंती उघड झाले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दहा वर्षापुर्वी मिळवलेली किशोर धाबे यांची पीएचडी रद्द केली. विद्यापीठाच्या निर्णयाला राजभवनाकडून मान्यता मिळाली. विद्यापीठाच्या इतिहासात संशोधन प्रबंधात वाङ्मय चौर्य केल्याप्रकरणी पीएचडी रद्द होण्याची पहिलीच घटना असल्याचा दावा केलाजातो आहे. विद्यापीठांतर्गत राज्यशास्त्र विषयात किशोर निवृत्ती धाबे यांनी दहा वर्षांपूर्वी पीएचडी पदवी प्राप्त केलेली होती. ‘किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्व आणि आदिवासीसाठींच्या करण्याणकारी ध्येय धोरणांची अंमलबजावणी’ विषयांतर्गत त्यांनी २०१३ मध्ये पीएचडी प्राप्त झाली. सदरील प्रबंधात वाङ्मय चौर्य करण्यात आल्याची तक्रार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या प्रबंधातील मजकूर चोरण्यात आल्याची तक्रार होती. विभागांतर्गत चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने अहवालात वाङ्मय चौर्य झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर सत्यशोधन समिती नेमण्यात आली. त्यांनीही घटनेची चौकशी केली आणि समितीने अहवालातही वाङ्मय चौर्य झाल्याचे म्हटले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद बैठकीत अहवाल ठेवण्यात आले.अहवाल स्वीकारून पीएचडी रद्द करण्यास दोन्ही ठिकाणी संमती देण्यात आली. त्यानंतर कुलपती रमेश बैस यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. विद्यापीठातर्फे प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा, विधि अधिकारी किशोर नाडे यांची उपस्थिती होती. सुनावणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करून पीएचडी रद्द करण्याचा निर्णय कुलपती यांनी मंजूर केला आहे. राजभवनचे अप्पर सचिव विकास कुलकर्णी यांनी विद्यापीठाला याबाबत पत्राद्वारे कळविले. विद्यापीठाच्या इतिहासात अशाप्रकारे पीएचडीत वाङ्मय चौर्य केल्याप्रकारणी एखाद्याची पीएचडीच रद्द करण्याची पहिली वेळ आहे. याची चर्चा उच्चशिक्षण वर्तुळात होत आहे.