उमेदवारांचे परीक्षा शुल्क मिळणार परत

Khozmaster
4 Min Read

उमेदवारांचे परीक्षा शुल्क मिळणार परत

बुलडाणा, दि. 23 (जिमाका): जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सरळसेवा पदभरती 2019 साठी  जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील 18 संवर्गाची सर्व जाहिरात, परीक्षा व संपूर्ण  भरती प्रक्रिया, ग्रामविकास विभाग यांच्या शासन निर्णय दि. 21 ऑक्टोबर 2022 अन्वये रद्द करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सन 2019 चे सरळसेवा पदभरती करीता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.

सरळसेवा पदभरती सन 2019 व ऑगस्ट 2021 (अपंग  व इतर सुधारित आरक्षणासह) पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहेत.  त्यानुसार सरळसेवा पदभरती सन 2019 व ऑगस्ट 2021 आरक्षणासह) पदभरती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांचे भरलेले शुल्क परत मिळविण्यासाठी http://maharsddzp.com या संकेतस्थळाला भेट देत संबंधित आवश्यक असलेली माहिती (उमेदवारांनी बँक खात्याचे विवरण व इतर अनुषंगिक माहिती) काळजीपूर्वक भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*******

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरा

        बुलडाणा, दि. 23 (जिमाका): माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दि. 20 नोव्हेंबर 2023 अखेर केवळ 4522 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ 8 ते 10 टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती,  फ्रिशिपचे अर्ज तातडीने भरावेत. जेणे करुन शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड  यांनी केले आहे.

*******

 

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामूल्य

स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

बुलडाणा, दि. 23 (जिमाका): राज्य शासनाकडून आदिवासी उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेची विनामूल्य तयारी करून घेण्यासाठी आदिवासी उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प येथे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार हा प्रशिक्षण कालावधी दि. 1 डिसेंबर 2023 ते 15 मार्च 2024 पर्यंत साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा  1 हजार दराने विद्यावेतन देण्यात येते. तरी पात्र आदिवासी उमेदवारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अटींची  पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी दि. 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत खालील पत्यावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, प्रवर्ग(जात), जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ऑनलाईन कार्ड: http://rojgar.mahaswayam.in इत्यादी प्रती व एक स्वत: चा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. उमेदवार निवडीसाठी दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली असून, दि. 29 नोव्हें. 2023 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावेत.

आदिवासी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र अचलपूर, कॅम्प, परतवाडा जि.अमरावती येथे दि. 30 नोव्हें 2023 रोजी दु 12 वाजता मुलाखतीसाठी  मूळ कागदपत्रासह उपस्थित रहावे निवड यादी त्याच दिवशी दि. 30 नोव्हें. 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 07223-221205, मोबाईल 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *