नंदुरबार -: पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-2024 या वर्षांसाठी राज्यस्तरीय नावीण्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी पात्र पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ऑनलाईन पद्धतीने 8 डिसेंबर, 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गायी, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, 1 हजार कुक्कुट मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसाहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप करणे तसेच 25+ 3 तलंगा गट वाटपासाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. जिल्हास्तरीय योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली असून लाभार्थ्यांने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-2022 पासून पुढील 5 वर्षांपर्यत लागू राहील.
पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालनापैकी ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे ती निवड करण्याची सुविधा, अर्ज व योजनांची संपूर्ण माहिती https://ah.mahabms.com संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईलवर AH-MAHABMS गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांकात बदल करू नये.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा,असेही डॉ.पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.