मुंबई : दसरा, धनत्रयोदशी किंवा दिवाळीला सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा भारतात गेल्या अनेक दशकापासून सुरू आहे. पण सणासुदीचे दिवस सुरू होताच सोन्याच्या किंमतींनी आजवरचे सर्वच रेकॉर्ड मोडले आहे. नवरात्रीसह देशभरात सणोत्सवाला सुरुवात झाली असून या काळातील वाढत्या मागणीचा मागोवा घेत सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. नवरात्रौत्सवास सुरू झाला असून आता येत्या काहीच दिवसांत दसरादेखील साजरा केला जाईल मात्र, त्यापूर्वीच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत तर आता दिवाळीला स्वस्त सोन्याची आशाही मावळली आहे.सोन्याच्या किंमतीत येत्या काही दिवसांत नरमाईची शक्यता कमी आहे त्यामुळे सणोत्सवात तुम्ही खरेदीचा विचार करत असाल तर आताच्या भावातच खरेदी करा कारण येत्या काही दिवसात सोन्याची किंमत आणखी वाढून नवीन उच्चांकी झेप घेण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. सणासुदीच्या काळात सराफा आणि तुटेल ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीमुळे शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १५० रुपयांनी वाढला आणि ७८,४५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या नवीन सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला तर, ऑल इंडिया बुलियन असोसिएशन (ibja) नुसार, चांदीचा भावही १,०३५ रुपयांनी वाढून ९४,२०० रुपये प्रति किलो झाला जो ९६ हजार रुपयांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ आहे.जगभरात सोने खरेदीला फुटले पंख
इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदार सोन्याच्या किमतीत विशेष रस दाखवत आहेत. यावर्षीच सोने एवढी पातळी गाठेल की तुम्हालाही धक्का बसेल. सोन्या-चांदीसाठी भारतीयांचे प्रेम कोणापासूनही लपलेले नाही आणि आता सणासुदीच्या हंगामात नवरात्री, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला उधाण येण्याची शक्यता असून यानंतर लग्नसराईचा सुवर्ण पर्व येणार आहे ज्यात लाखो लग्नांसाठी करोडो रुपयांचे सोन्याची खरेदी-विक्री होईल.
धनत्रयोदशीपर्यंत भाव किती वाढणार?
IIFL सिक्युरिटीजचे कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता म्हणतात की सध्या जागतिक बाजारपेठेत दर वाढवण्याचे सर्व घटक दिसत आहेत. महागाई आणि धोरणात्मक तणावामुळे सोन्याचे भाव नक्कीच वाढतील. अशा स्थितीत सध्याच्या ट्रेंडनुसार धनत्रयोदशीपर्यंत सोन्याचा भाव ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे जाऊ शकतो. अशाप्रकारे गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीपासून यावर्षी सोन्याच्या किमतीत सुमारे २० हजार रुपये प्रति १० ग्रॅमची वाढ होईल आणि त्यानंतर डिसेंबरपर्यंत ८५,००० टप्पा ओलांडला तर त्यात थेट १२% वाढ होईल जी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक परतावा देणारी ठरेल.गेल्या वर्षी २०२३ मध्ये धनत्रयोदशीला सोन्याचा भाव ६०,४४५ रुपये प्रति १० ग्रॅम होता तर सध्या दसऱ्यापूर्वीच सोन्याने ७८,५०० रुपयांचा पल्ला गाठला आहे.
करोना काळातच सोन्याची किंमत घटली
दुसरीकडे, गेल्या सात वर्षातील धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किंमतीचा कल पाहिला तर केवळ करोना काळातच सोन्याच्या किंमती दोनदा घसरल्या झाले तर इतरवर्षी किंमती वाढत राहिल्या. २०१८ च्या धनत्रयोदशीला सोन्याचा दर ३२,६०० रुपये होता तर, २०१९ मध्ये ३८,२०० रुपयांवर उसळला मग २०२० मध्ये सोन्याने ५१ हजार रुपयांचा दर ओलांडला पण, नंतर २०२१ च्या धनत्रयोदशीत ४७,६५० रुपयांवर घसरला आणि नंतर २०२२ मध्ये पुन्हा ५० हजार रुपयांचा आकडा गाठला. त्याचवेळी वेळी एका वर्षात म्हणजेच गेल्या धनत्रयोदशीला सोन्याची किंमत ६० हजार रुपयांच्या वर होती जी यावेळी ८० हजार रुपयांच्या दिशेने अग्रेसर आहे.