महिन्याचा पहिला दिवस महागाईचा; सणासुदीच्या तोंडावर महागला LPG सिलिंडर, दिल्ली ते मुंबई किती वाढले दर?

Khozmaster
2 Min Read

मुंबई : आज ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस असून या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का बसला आहे. होय, मंगळवारी सकाळी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ जाहीर झाली आहे. म्हणजेच १ ऑक्टोबर २०२४ पासून तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत मात्र, यावेळीही केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सुधारित केली आहे तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. दर वाढल्यानंतर आता नवीन भावही समोर आले आहेत.

सणासुदीपूर्वीच ग्राहकांना दरवाढीचा धक्का
तेल विपणन कंपन्यांनी १ ऑक्टोबरला सकाळी एलपीजी ग्राहकांना मोठा धक्का दिला आणि व्यावसायिक सिलिंडरची किंमत ४८.५० रुपयांपासून ते ५० रुपये वाढवली आहे. अशाप्रकारे आता मुंबईत सप्टेंबरमध्ये व्यवायिक गॅस सिलिंडर १,६०५ रुपयांवरून १,६४४ रुपयांपर्यंत वाढला होता तर आता ऑक्टोबरच्या दरवाढीनंतर ग्राहकांना व्यावसायिक सिलिंडरसाठी १,६९२.५० रुपये मोजावे लागतील.

इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, आता दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १,७४० रुपये झाली पण तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच, राजधानी दिल्लीत ८०३ रुपयांना उपलब्ध असेल. IOCL च्या वेबसाईटनुसार व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती आज १ ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत. गेल्या जुलै २०२४ पासून व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून एकीकडे १ जुलै २०२४ रोजी तेल विपणन कंपन्यांनी LPG दर कपातीची भेट दिली होती पण, पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२४ मध्ये व्यावसायिक सिलिंडर ८.५० रुपयांनी महागला. त्याचवेळी, सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना धक्का बसला.

हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये खाणे महागणार
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि हायवेवरील ढाब्यांवरील खाद्यपदार्थांच्या दरांवर परिणाम होऊ शकतो कारण या ठिकाणी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. याशिवाय तेल विपणन कंपन्यांनी गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. सप्टेंबर आणि ऑगस्टमध्येही अनुक्रमे ३९ रुपये आणि ८ ते ९ रुपयांची वाढ झाली होती.

एकीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने बदल होत असताना दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती दीर्घकाळापासून कायम आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरवर ग्राहकांना मोठा दिलासा दिला आणि त्यानंतर घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी झाली असून तेव्हापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत. एका घरगुती सिलिंडरची किंमत मुंबईत ८०२.५० रुपये आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *