कोल्हापूर : महाराष्ट्रातील कष्टकरी,कामगारांचे नेते आणि रस्त्यावरील लढाईसोबत समाजाची वैचारिक जडण घडण झाली पाहिजे यासाठी लेखन करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे यांची आज जयंती आहे. कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सोप्या शब्दांमध्ये मांडलं. शिवाजी कोण होता? या पुस्तकानं विक्रीचे विक्रम प्रस्थापित केले. हिंदी, कन्नड आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये ते पुस्तक भाषांतरीत झालं. कॉ. गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराजांचं जे चित्रण केलं होतं ते इथल्या कष्टकऱ्यांशी, शेतकऱ्यांशी आणि सामान्य माणसांसोबत महाराजांची नाळ जोडणारं होतं. या पुस्तकाचं आतापर्यंत ३६ वेळा पुनर्मुद्रण झालं असून दीड लाखांपेक्षा अधिक प्रती वाचकांनी विकत घेतल्या आहेत. या पुस्तकाची १० एप्रिल १९८८ पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती.कॉ. गोविंद पानसरे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार या गावी झाला. २४ नोव्हेंबर १९३३ रोजी त्यांचा प्रवरा नदी काठावर असलेल्या कोल्हार गावातील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. गोविंद पानसरे यांच्या कुटुंबाकडे जी थोडीफार शेती होती ती सावकरांनी ताब्यात घेतल्यानं गेली. कोल्हारमध्ये माध्यमिक आणि राहुरीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोविंद पानसरे यांनी कोल्हापूरमधील राजाराम कॉलेज, कोल्हापूर आणि शहाजी लॉ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. गोविंद पानसरे उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आले होते. पुढे कोल्हापूर हिच त्यांची कर्मभूमी बनली. कोल्हापूरमध्ये त्यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून देखील काम केलं. नगरपालिकेत शिपाई, शिक्षक त्यानंतर शिवाजी विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं तर कामगारांच्या प्रश्नांसाठी वकिली देखील केली.
भाकपमधून राजकारण
कॉ. गोविंद पानसरे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे १९५२ पासून सभासद होते. त्यांनी भाकपचे महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून काम केलं. १९५५ च्या गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी होते. ते संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कोल्हापूर येथील जिल्हा शाखेचे सचिव देखील होते. याशिवाय महाराष्ट्रातील कष्टकरी, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचे ते मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडत होते.