चालत्या बसमध्ये भांडण, सासू-सासऱ्याने जावयाला संपवलं; मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर, CCTV फुटेजमुळे उलगडा

Khozmaster
4 Min Read

कोल्हापूर : दारूच्या नशेत पत्नी आणि नातेवाईकांना शिवीगाळ करून त्रास देत असल्याने सासू – सासऱ्याने जावयाची चालत्या एसटीमध्ये गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृततदेह एसटी स्टँड आवारात ठेवल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. मृत संदिप रामगोंडा शिरगांवे, रा. चिंचवाड, ता. शिरोळ असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात गुन्ह्याची उकल करत संशयित आरोपी गौरा हनमंत आप्पा काळे वय, ४५ आणि सासरा हनमंत आप्पा यल्लाप्पा काळे वय, ४९ दोघे रा. भडगांव, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर या दोघांना अटक केली आहे.

बेवारस स्थितीत एसटी स्टँडवर आढळला मृतदेह

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी सी.बी.एस. स्टँड परिसरात एक अज्ञात व्यक्ती बेवारस स्थितीत मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांनी तात्काळ सी.बी.एस. स्टँड येथे घटनास्थळी पाहणी केली. यावेळी बेवारस स्थितीत असलेल्या व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मृत व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याजवळील कागदपत्रावरुन त्याचे नाव संदिप रामगोंडा असल्याचे समजले. त्यानंतर मृत व्यक्तीचा मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी सी.पी.आर रुग्णालयात पाठवण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज आणि मृताजवळील कागदपत्रांच्या आधारे गुन्हेगारांना ताब्यात घेतलं

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पथक नेमून तपासासाठी रवाना केले. दरम्यान मृतदेह मिळालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशी केले असता रात्रीच्या सुमारास एक अनोळखी महिला आणि एक पुरुष अशा दोन व्यक्तींनी मृतदेह एस.टी. स्टँड परिसरातून उचलून आणून ठेवला असल्याचं दिसलं. नंतर मृतदेहाजवळील कागदपत्रातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत संदिप रामगोंडा शिरगांवे याच्या नातेवाईकांना शोधत त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. त्यावेळी संदिप शिरगांवे हा दारुचा व्यसनी असून तो त्याच्या पत्नी आणि मुलाला दारु पिऊन त्रास देत असल्याने त्याची पत्नी आणि मुलगा त्याच्यापासून विभक्त होत गडहिंग्लजमध्ये राहत असल्याचे समजले.

घटस्फोटीत पत्नी आणि मुलाला सतत दारू पिऊन द्याय द्यायचा

या माहितीवरून पोलिसांनी सासू गौरा हनमंतआप्पा काळे आणि सासरा हनमंत आप्पा यल्लाप्पा काळे यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता मृत व्यक्ती संदिप शिरगांवे हा दारुचा व्यसनी असल्याने तो पत्नी, मुलांना नेहमी त्रास देत होता, म्हणून त्याच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेत तिच्या लहान मुलासह ती गडहिंग्लज येथे गेले दोन वर्षापासून राहत होती. मात्र तरीही संदिप गडहिंग्लज येथे दारु पिऊन जात पत्नी-मुलांना त्रास देत मारहाण करत असल्याचे सासू-सासर्‍याने सांगितले.दरम्यान, तीन दिवसापासून संदिप शिरगांवे हा गडहिंग्लज येथे जात सतत दारु पिऊन पत्नी, मुलाला त्रास देत मारहाण करत होता. म्हणून संशयित आरोपी असलेल्या सासू-सासर्‍यांनी त्याला समजावून सांगत असतानाही तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्याला रात्री उशिरा गडहिंग्लज येथून एसटी बसमधून कोल्हापूर येथे सोडण्याकरता घेऊन येत होते. त्यावेळी संदीपने चालू गाडीत पुन्हा भांडण्यास सुरूवात केली. त्यावेळी सासरा हनमंत आप्पा यल्लाप्पा काळे आणि सासू गौरा हनमंत आप्पा काळे यांनी संदीपचा दोरीने गळा आवळून त्याला ठार मारले. यानंतर मध्यरात्री एसटी कोल्हापूर स्थानकात येताच मृतदेह एसटी बसमधून खाली उतरवून एसटीच्या आवारात ठेवला असल्याचे सांगत सासू-सासऱ्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. या घडलेल्या घटनेनंतर शाहुपूरी पोलीस ठाणे येथे हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *