‘वक्फ’ कायदा रोखून दाखवाच! अमित शहा यांचं कोल्हापुरात राहुल गांधींना खुलं चॅलेंज

Khozmaster
2 Min Read

कोल्हापूर : ‘आगामी हिवाळी अधिवेशनात आम्ही वफ्फ बोर्डाचा कायदा चर्चेला आणणार आहे, तो आम्ही मंजूर करणार आहोत. तो राहुल गांधी यांनी रोखून दाखवावा,’ असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरात दिले. ‘भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागा निवडून आल्या तरच आपलं सरकार पुन्हा राज्यात येणार आहे, या दोघांच्या जागा आल्या नाहीत तर त्याचा फायदा विरोधकांना होणार आहे,’ हे कार्यकत्यांनी लक्षात ठेवावे असे आवाहनही शहा यांनी केले.

राज्यातील निवडणुकीच्या विधानसभा पार्श्वभूमीवर भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकत्यांचा मेळावा कोल्हापुरात घेण्यात आला. या मेळाव्यात शहा यांनी राज्यात पुन्हा सत्ता येण्यासाठी आणि अधिकाधिक जागा निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. या वेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचलन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. शहा भाषणात म्हणाले, ‘अंबाबाईचे दर्शन घेऊन पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्याचा संकल्प केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांत गेलो. तेथे आपल्याअपेक्षेपेक्षा जागा कमी झाल्याचे दिसले. त्यामुळे आता निवडणुकीचे गणित समजून घेतले पाहिजे. निराशा दूर केली पाहिजे.२०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांत काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा आपल्याला या लोकसभा निवडणुकीत मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पूर्वी आम्हाला ‘हम दो, हमारे दो’ असे चिडवतअसत; पण आता आम्ही ३०५ जागा जिंकल्या आहेत.’ फडणवीस म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात ताकदीने उत्तरलो तर या निवडणुकीमध्ये आपले सगळे जुने रेकॉर्ड तोडू शकतो, हा आत्मविश्वास भाजपच्या सर्व कार्यकत्यांनी ठेवावा. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या काळात जे झाले नाही, ते आम्ही सिंचनाच्या माध्यमातून केले आहे. यामुळे दुष्काळाच्या झळा कमी झाल्या.

आमदार प्रकाश आवाडेंचा भाजप प्रवेश
इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. गेली पाच वर्षे आवाडे भाजपचे सहयोगी सदस्य होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत असल्याने तो रखडला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षात घेण्यात आले. इचलकरंजीतून राहुल आवाडे यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात येणार आहे. तसा शब्द आवाडे यांना देण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *