कोल्हापुरात चांदी व्यापाऱ्याची हत्या, घरातून १५ लाखांचे दागिने लंपास, धाकटा भाऊ ताब्यात

Khozmaster
3 Min Read

 कोल्हापूर : कोल्हापुरात ३१ वर्षीय युवा चांदी व्यावसायिक ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे याची राहत्या घरी हत्या करण्यात आली. चांदीची नगरी म्हणून ओळख असलेल्या हुपरी येथील पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील सिल्व्हर झोनमध्ये हा प्रकार घडला. ब्रह्मनाथवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा निर्घृण खून झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

हल्ल्यानंतर आरोपींनी कपाटातील सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदी आणि चांदीचे दागिनेही लंपास केले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे. या प्रकरणी भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला संशयित म्हणून हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून हुपरी आणि गोकुळ शिरगाव पोलिस या खुनाचा तपास करीत आहेत.

नेमकं काय घडलं?

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील हुपरी येथील पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील सिल्व्हर झोन येथे आपल्या आई वडिलांसोबत ब्रह्मनाथ हालुंडे वास्तव्यास होता. बाहेरून ऑर्डर घेऊन मागणीनुसार चांदीचे दागिने बनवून घेऊन पोहोच करण्याचा त्यांचा व्यवसाय होता.

घरात कुणी नसताना आरोपी शिरले

शनिवारी २१ सप्टेंबर रोजी वडील व आई सुमन हे त्यांच्या मूळगाव असलेल्या निपाणी येथील जैनवाडी मधील शेताकडे कामानिमित्त गेले होते. तर ब्रह्मनाथ घरी एकटाच होता. रविवारी या संधीचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी दुपारी घरात शिरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. छातीत खोलवर दोन व मानेवर, दंडावर, अंगावर चार वर्मी घाव पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर हल्लेखोरांनी जाताना तिजोरीतील सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदी व चांदीचे दागिने लंपास केले. तसेच संपूर्ण घराची नासधूस केली.

लेकाचा मृतदेह पाहताच आईचा हंबरडा

रविवारी सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडाच होता. घरातील चित्र पाहून आई वडिलांना मोठा धक्का बसला. घरात सर्वत्र मुलाचं रक्त आणि त्याचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून शेजारीही जमा झाले. या घटनेची माहिती देताच तत्काळ हुपरी आणि गोकुळ शिरगांव पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निरीक्षक एन आर चौखडे, निरीक्षक पंकज गिरी, सपोनि दिगंबर गायकवाड, प्रसाद कोलपे, नितेश कांबळे, दर्शन धुळे यांच्यासह पोलीस पथक ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला. कपाटातील २५ किलो चांदी व दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी व्यक्त केली.

भावासोबत कौटुंबिक वाद

ब्रह्मनाथ हा सरळमार्गी व धार्मिक वृत्तीचा होता. तो अविवाहित होता. गावात त्याचे जास्त मित्रही नव्हते. त्याला एक धाकटा भाऊ आणि बहीण असून दोघेही विवाहित आहेत. ब्रह्मनाथ आणि भाऊ दोघांमध्ये कौटुंबिक वाद असल्याने दोघे वेगळे राहतात अशी चर्चा परिसरात सुरू होती. या चोरी व खून प्रकरणी त्याच्या संशयित भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र गेल्या महिनाभरात हुपरीमध्ये दुसरा खून झाल्यामुळे सध्या या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *