जालना : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात दाखल झाली. या युवा संघर्ष यात्रेत पवार बापलेकाचं दृढ नातं पाहायला मिळालं. रोहित पवार यांच्या यात्रेत पाठीमागे पिता राजेंद्र पवार चालत येताना दिसले.
आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात पोहोचली असून या यात्रेला मंठा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवा संघर्ष यात्रेचा आज जालना जिल्ह्यात शेवटचा दिवस असून या शेवटच्या दिवशी रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार देखील पदयात्रेत सहभागी झाले आहेत.
आमदार रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांचं बाप लेकाचं दृढ नातं या निमित्ताने व्हिडिओत कैद झालं असून हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वाटूर फाटा या ठिकाणी गेली. तेव्हा रोहित पवार यांनी पपई उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. पपईला पिक विमा नसल्याने लाखोंचे नुकसान झाले असतानाही कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही असे यावेळी शेतकऱ्यांनी रोहित पवार यांना सांगितले. याबाबत आपण अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून मदत मिळवून देण्याबाबत सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया यावेळी रोहित पवार यांनी दिलीय.परतूर तालुक्यात काल धनगर समाज बांधवांनी आमदार रोहित पवार यांना भंडारा लावत धनगर आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत उठवा असे सांगून धनगर आरक्षणाची मागणी केलीय. यावेळी परतूर सकल धनगर समाजाने आपल्या मागण्यांचे निवेदन रोहित पवार यांना देत त्यांनाही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत सामील केलंय. कालही पिंपरखेडा येथे सकाळी साडेसहा वाजता व्यायाम करून रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेच्या प्रवासाला सुरुवात केली होती.