नागपूर: बडतर्फ शिक्षकाने घरात घुसून तोंडाला चिकटपट्टी बांधून शिक्षणसंस्था चालकाच्या पत्नीवर हल्ला केला. या घटनेने संतप्त नागरिकांनी संबंधीत शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. यात शिक्षकही जखमी झाला आहे. वेळीच पोलिसांनी शिक्षकाची सुटका केल्याने अनर्थ टळला. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग मार्गावरील नवीन नंदनवन येथे घडली.
काही दिवसांपूर्वी नितीन हा नागपुरात राहणाऱ्या भावाकडे आला. शुक्रवारी दुपारी नितीन हा जिभकाटे यांच्या नवीन नंदनवन येथील घरात घुसला. यावेळी संजीवनी या घरी एकट्या होत्या. लोखंडी रॉड दाखवून त्याने संजीवनी यांना ठार मारण्याची धमकी दिली. संजीवनी घाबरल्या. त्यानंतर नितीनने त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी चिटकवली. ‘काहीही चूक नसताना मला बडतर्फ केले. आता बघा मी काय करतो’, असे म्हणत नितीनने लोखंडी रॉडने संजीवनी यांच्या दोन्ही हातावर वार केले. याचदरम्यान संजीवनी यांची बहीण आली. घडलेला प्रकार बघून तिही घाबरली. संजीवनी यांच्या बहिणीने आरडाओरड करताच शेजारी जमले.संजीवनी यांची अवस्था बघून संतापलेल्या शेजाऱ्यांनी पकडून नितीनला चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यान एका नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राऊत यांच्यासह नंदनवन पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून नितीनची सुटका केली. संजीवनी आणि नितीन या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर डॉक्टरांनी नितीनला सुटी दिली. पोलिसांनी गंभीर दुखापतीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून नितीनला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नितीनची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. संजीवनी यांच्यावर सक्करदऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Users Today : 15