विरार
पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात मंगळवारी भरदिवसा घडलेल्या एका निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिरगाव परिसरात आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणामुळे बेकायदेशीर खदानी, जमिनी हडप प्रकरणे आणि स्थानिक दबंगगिरी पुन्हा चर्चेत आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम पाटील हे मंगळवारी दुपारी वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शिरगाव येथील खदान परिसरात शासकीय पाहणीसाठी गेले होते. खदानीसंदर्भातील तक्रारींची चौकशी सुरू असताना काही जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
कुटुंबीयांचा गंभीर आरोप
या हत्या प्रकरणात आत्माराम पाटील यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. आरोपी भालचंद्र पाटील आणि महेश पाटील यांच्या विरोधात अनधिकृत बंगले, बेकायदेशीर खदानी तसेच जमिनी बळकावल्याबाबत आत्माराम पाटील यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींचा राग मनात धरूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोरच आत्माराम पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. “गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवल्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आले,” असे नातेवाईकांनी सांगितले.
10 ते 12 जणांचा सहभाग?
शिरगाव येथील खदानीबाबत अमित चौधरी यांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. यावेळी आत्माराम पाटील परिस्थिती दाखवण्यासाठी सोबत गेले असता आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात 10 ते 12 जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
घरात पूजा, बाहेर रक्तरंजित घटना
या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आत्माराम पाटील यांच्या भावाच्या मुलाचे लग्न पार पडले होते. मंगळवारी घरात सत्यनारायणाची पूजा सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. घरात धार्मिक विधी सुरू असताना बाहेर आत्माराम पाटील यांची हत्या झाल्याची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
“विरारचा आका” कोण?
या प्रकरणातील मुख्य आरोपी भालचंद्र पाटील हा विरार पूर्व परिसरातील प्रभावशाली व्यक्ती असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अनेकांच्या जमिनी बळकावल्याचे आरोप यापूर्वीही त्यांच्यावर झाल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या हत्येमुळे पालघर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
Users Today : 10