मेळघाट व्याघ्रप्रकल्पात फुलपाखरांच्या ८८ प्रजातींची नोंद; ‘या’ आहेत सात नव्या प्रजाती

Khozmaster
2 Min Read

नागपूर : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात झालेल्या फुलपाखरू सर्वेक्षणात ८८ प्रजातींच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सात नवीन प्रजाती आढळल्या आहेत. या नव्या नोंदीमुळे मेळघाटातील एकूण फुलपाखरू प्रजातींची संख्या आता १४१ इतकी झाली आहे.१७ ते २० नोव्हेंबरदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी प्रथमच मेळघाटात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात विविध ठिकाणाहून आलेल्या अभ्यासकांसह मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी सहभागी झाले होते. मेळघाटात सातत्याने आढळणाऱ्या १३४ फुलपाखरांच्या प्रजातींपैकी एकूण ८८ प्रजातींची नोंद यावेळी घेण्यात आली. तीन दिवसांच्या सर्वेक्षणात गोळा करण्यात आलेल्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर ८८ प्रजातींची जवळपास २९८० फुलपाखरे प्रकल्पाच्या परिसरात आढळली. यापूर्वी वन्यजीव अभ्यासक डॉ. जयंत वडतकर यांनी मेळघाटमध्ये फुलपाखरांचा अभ्यास केला असून त्यांनी एकूण १३४ प्रजातींची

नोंद केली होती. त्यापैकी, सध्याच्या ऋतुत ८८ प्रजाती आढळून आलेल्या आहेत. फुलपाखरांच्या सात नवीन प्रजातींच्या नोंदी रोहित टेकोडे, दीपक जोशी, व्योम चौधरी, प्रा. सफल पाटील, मनीष ठाकरे व इंदाराम नागेश्वरराव यांनी घेतल्या आहेत. यादरम्यान महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू नीलवंत किंवा ब्ल्यू मॉर्मनही आढळून आले.मेळघाटच्या क्षेत्रसंचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक जयकुमारन, सुमंत सोळंके आणि दिव्या भारती तसेच विभागीय वनाधिकारी मनोज खैरनार व यशवंत बहाळे यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण पार पडले. मानद वन्यजीवरक्षक डॉ. जयंत वडतकर आणि प्रा. डॉ सावन देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वपूर्ण योगदान दिले. या सर्वेक्षणाच्या यशस्वितेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षाली रिठे, वनविभागाचे स्वप्निल बांगडे, अतुल तिखे आणि मनीष ढाकुलकर यांनी परिश्रम घेतले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *