अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अभिषेक बलकवडे याने पैसे दिल्याचे उघड झाले आहे. ललित ससूनमध्ये असताना तो इंगळेशी संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी (ता. २९) न्यायालयास दिली.
सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या समुपदेशकाचे नाव आहे. ललित पाटील हा भूषण पाटीलचा भाऊ तर अभिषेक बलकवडे हा त्याचा साथीदार आहे. या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र यशवंत शेवते (वय ५७, रा. रक्षकनगर, खराडी)
आणि येरवडा कारागृहातील पोलिस मोईस अहमद शेख (वय ३०, मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) यांना अटक केली आहे. तर, इंगळेला मंगळवारी उशिरा अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
इंगळेला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
इंगळेने बलकवडेकडून पैसे घेतल्याचे समोर आले आहे. त्याने पैसे का घेतले? ते पैसे अमली पदार्थ विक्रीतून जमा झालेले होते का? याचा सखोल तपास करायचा असल्याने इंगळे याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. निलीमा इथापे-यादव यांनी केला. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (ता.१) पोलिस कोठडी सुनावली आहे.
ललितच्या चालकालाही अटक
ललित ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणात त्याचा चालक सचिन वाघ याला पुणे पोलिसांनी ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले आहे. वाघ याला मुंबई पोलिसांनी बंगळूर येथे ललितसोबत अटक केली होती. ललित ससूनमधून पळून गेल्यानंतर वाघ याने त्याला मदत केली होती. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयात प्रॉडक्शन वॉरंट सादर करून पुणे पोलिसांनी वाघला ताब्यात घेतले आहे.
Users Today : 16