चिखली/ प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच इतरही मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण येत्या विधानसभा हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून न्याय देण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी आमदार श्वेताताई महाले यांच्याकडे अंगणवाडी कर्मचार्यांच्या विविध संघटनांनी एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी. त्यानुसार अंगणवाडी कर्मचारी ही वैधानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधनवाढ जाहीर करावी. मदतनीस व सेविकांचे मानधन किमान 18 हजार ते 26 हजारापर्यंत असावे. सेविका व मदतनिसांच्या मानधनात 100 ला 75 असे प्रमाण असावे. मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते. तरी मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी. महिला व बालविकास मंत्र्यांशी चर्चा झाल्यानुसार विना योगदान मासिक निर्वाह भता (पेन्शन) सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव मा. मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करवून घ्यावा. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथील करून अंगणवाड्यांसाठी किमान रु 5000 ते 8000 भाडे मंजूर करावे. आहाराचा 8 रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी 16 व अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये असा करावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
हिेवाळी अधिवेशनात आमच्या मागण्यांना न्याय मिळवून द्या.. अंगणवाडी कर्मचार्यांचे आ.श्वेताताईंना साकडे
Leave a comment