कार्तिकी एकादशी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यावर बंदचं सावट, ग्रामस्थांकडून आळंदी बंदची हाक

Khozmaster
2 Min Read

आळंदी, पुणे : आळंदी येथील विश्वस्तपदाच्या निवडीवरून आज आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर सावट आल्याचे पाहायला मिळत आहे. आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल होत असून आज पायरी पूजन कार्यक्रम होणार आहे. मात्र आळंदीकरांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे वारकरी संभ्रमावस्थेत आहेत.

आळंदी येथील ग्रामस्थांच्या मुलाखती घेऊनही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर आजपर्यंत घेण्यात आलेले नाही. आळंदीतील समितीवर ग्रामस्थांना डावलल्याने आळंदी ग्रामस्थांकडून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आज बंदची हाक देण्यात आली आहे.या संदर्भात आळंदी पोलिसांना निवेदन देखील देण्यात आले आहे. त्यामुळे तोंडावर आलेली कार्तिकी यात्रा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर बंदचे सावट आल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या विश्वस्त निवडीचा निषेध करण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आणि शांततापूर्वक पद्धतीने आज सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आळंदी बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता चाकण चौक ते बहादुर चौक यादरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची सांगता सभेने होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

याबाबत मंदिर विश्वस्त ढगे यांनी सांगितले की, आळंदी ग्रामस्थांनी एक दिवस बंदची हाक दिलेली आहे. आळंदी ग्रामस्थांनी आजपर्यंत वारकऱ्यांना जे प्रेम दिले त्यांचा पाहुणचार केला त्याच पद्धतीने या सर्व गोष्टी होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी बंद करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 9 3 7 8 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *