अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा गावानजीक एका रिसॉर्टच्या मागे खुल्या मैदानात रेड्यांची झुंज लावून त्यावर पैसे उधळणाऱ्यांवर फ्रेजरपुरा पोलिसांनी कारवाई केली.
रेड्यांची एकूण नऊ वाहने ठाण्यात आणून जप्त केली. रविवारी (ता. तीन) दुपारपासून जिल्ह्यातील पशुपालकांनी २५ ते ३० रेड्यांना वाहनांमध्ये टाकून पोहरा मार्गावरील मैदानात आणून उभे केले. उपस्थित नागरिक व पशुपालक यांच्या माध्यमाने रेड्यांवर पैशाच्या रूपात बोली लावल्या गेली.
ठरलेल्या बोलीनंतर रेड्यांच्या झुंजी होणार होत्या. प्रत्येक झुंजीवर वेगवेगळी रक्कम लावल्या जात होती. रेड्यांची झुंज बघण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील आबालवृद्धांसह लहान मुले, असा जवळपास दोन ते अडीच हजारांचा जमाव याठिकाणी जमला होता. रेड्यांचे प्रदर्शन व झुंज संदर्भात आयोजकांनी पोलिसांकडून अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती.
घटनास्थळी जमलेला जमाव आणि इतर बाबी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फ्रेजरपुरा पोलिसांनी रेड्यांची झुंज आयोजित करणाऱ्या जतीन गुरुसिंग ठाकूर, तमीज खॉं असलम खॉं, अब्दुल फयास अब्दुल नासीर, शेख अमीर शेख रशीद, नवल परसराम नंदवंशी, अब्दुल वसीम अब्दुल मुसीन, संतोष मोतीराम राठोड, सागर प्रमोद मोहोड, नसीम बेग बब्बू बेग यांच्या मालकीची एकूण नऊ वाहने जप्त केली.
या वाहनांतूनच रेड्यांना आणण्यात आले होते. जुगार खेळतात त्याप्रमाणे रेड्यांच्या झुंजीवर त्यांना क्रूरपणे वागणूक देणे, ही बाब चुकीची आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. रेड्यांच्या मालकांसह वाहन चालकांना नोटीस बजावण्यात आली. जवळपास ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
रेड्यांची झुंज लावून त्यांना क्रूर वागणूक देणे, हा कायदेशीर गुन्हा ठरतो. शिवाय घटनास्थळी जमलेला जमाव लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर ही कारवाई केली
Users Today : 20