पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण १४ पैकी सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
ललितच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम (वय ३३) आणि ॲड. प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय ३९, दोघीही रा. नाशिक), ललितचा भाऊ भूषण पाटील (वय ३४ ) साथीदार अभिषेक बलकवडे (वय ३१, सर्व रा. नाशिक) रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अऱ्हाना (वय ५०, रा. कॅम्प), त्याचा चालक दत्तात्रेय डोके (वय ४०, रा. हडपसर) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ (सरकारी कर्मचाऱ्याला बेदरकारपणे कैदेतून किंवा कोठडीतून पळून जाणे), २२४, २२५ (कायदेशीर अटक करण्यास विरोध करणे), १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३४ (समान हेतू) या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मेफेड्रोन या अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ऑक्टोबर २०२० मध्ये लिलतला अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्यावर ससूनमध्ये उपचार सुरू होती. ससून रुग्णालयातून मेफेड्रोन रॅकेट उघड झाल्यानंतर ललित दोन ऑक्टोबरला पळून गेला होता.
त्याला मुंबर्इ पोलिसांनी १७ ऑक्टोबरला अटक केली आहे. पाटील याला तळोजा कारागृहातून ३१ ऑक्टोबर रोजी पुणे अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोक्कानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
अन्य आरोपींचा तपास सुरू राहणार –
उर्वरित आठ आरोपींचा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३ (८) अन्वये तपास सुरू ठेवण्यात येणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
ललित नाशिकला थांबला होता –
विनय अऱ्हानाच्या सांगण्यावरून दत्तात्रेय डोके याने ललित पाटील हा कैदी वॉर्डातून पळून गेल्यानंतर त्याला १० हजार रुपये रोख आणि मोबाईल ला होता. तसेच भूषण हा ललित आणि अभिषेक बलकवडे या दोघांशी संपर्कात होता. पळून गेल्यानंतर ललित नाशिकला पोचला होता आणि अर्चना निकमच्या निवासस्थानी थांबला, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
Users Today : 19