पुणे : चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हडपसर औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत सोमवारी घडली.मोतीलाल साहू (वय १६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी आरोपी धीरजसिंग गोपालसिंग गौड (वय २१) याला अटक केली आहे.याबाबत मोतीलालचा मामा शंकरदिन रामदिन साहू (वय ३४, रा. मूळ बडागाव, ता. बरही, जि. कटनी, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.
कंपनीतील तिसऱ्या मजल्यावर सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास धीरजसिंग काम करीत होता. त्यावेळी चेष्टा मस्करीतून धीरजसिंगने यंत्रांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर कॉम्प्रेसरने मोतीलालच्या गुदद्वारात हवा भरली. हवा पोटात शिरल्यामुळे शारीरिक इजा होऊन मोतीलालचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत.
Users Today : 19