पुणे – ‘मुलं कोणत्याही वयोगटातील असोेत त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. झोप अपूर्ण झाल्यास मुलं चिडचिड करतात, कोणत्याही गोष्टीत त्यांचे मन रमत नाही. त्यामुळे अभ्यासातही त्यांचे लक्ष लागणार नाही, म्हणून सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळेत बदल करण्यास हरकत नाही,’ असे सूतोवाच पालक, शिक्षक यांच्यासह समुपदेशकांनी केले.
मुलांची झोप पूर्ण होणे आवश्यक असून त्या दृष्टीने सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचा विचार व्हावा, अशी सूचना ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी मांडली. त्यानंतर त्याला दुजोरा देत पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, समुपदेशकांनी आपले म्हणणे मांडले आहे.
एकीकडे मुलांना चांगल्या सवयी, शिस्त लागावी, म्हणून मुलांना सकाळी लवकर उठवणे गरजेचे आहे. म्हणून सकाळी शाळा असायला हवी, असे काहींचे म्हणणे आहे. तर मुलांची झोप पूर्ण होणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे तरच त्यांना ऊर्जा मिळेल आणि अभ्यासात लक्ष लागेल, असे काहींनी सुचविले आहे.
तर बदलत्या जीवनशैलीनुसार पालक रात्री उशिरापर्यंत जागे असल्यामुळे मुलंही रात्री उशिरा झोपतात. परिणामी त्यांची पुरेशी झोप होत नाही. खऱ्या अर्थाने मेंदूचे कार्य हे माणूस झोपल्यानंतरच सुरू होते, असे समुपदेशक सांगत आहेत.
‘… तर अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल’
‘मुलं कोणत्याही वयोगटातील असो, त्याची झोप पूर्ण होणे (किमान आठ तास) अत्यंत आवश्यक आहे. आपण झोपलेले असताना मेंदूचे कार्य सुरू होते. आजकाल आई-वडिलांच्या जीवनशैलीमुळे मुलं रात्री उशिरापर्यंत जागी असतात. मात्र, सकाळी मुलांनी लवकर उठून शाळेला जावे किंवा अभ्यास करावा, अशी पालकांची अपेक्षा असते,
परंतु झोपेतून उठल्यानंतर फिरायला जाणे, खेळणे किंवा काही कृती केल्यानंतर मुलांमध्ये ऊर्जा निर्माण होईल, त्यानंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल. त्यामुळे अगदी सकाळी सहा किंवा सात वाजता शाळा असण्यापेक्षा सकाळी नऊच्या दरम्यान शाळा असायला काही हरकत नाही,’’ असे मत मेंदू अभ्यासक आणि समुपदेशक डॉ. श्रुती पानसे यांनी व्यक्त केले.
शिक्षक म्हणतात
तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या शाळेची सुरुवात नुकतीच झालेली असते. त्यात शाळा सकाळची असली, तर गडबड उडतेच. मुले सकाळी लवकर उठत नाहीत. आवरत नाहीत. झोप पूर्ण न झाल्याने कधी-कधी विद्यार्थी अक्षरशः वर्गातील बाकड्यावर झोपी जातात. शाळा दुपारी असेल, तर मुलांची झोप पूर्ण झालेली असते. त्यामुळे ते अधिक आनंदी आणि उत्साही असतात.
– शीतल पवार, मुख्याध्यापिका, शारदा बालक विहार आपटे प्रशाला
सध्या ऋतुमानामध्ये खूप बदल होत आहेत. बदलत्या हवामानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे मुलांचे वय, आरोग्य आणि सभोवतालचे हवामान पाहून सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी साडे आठ ते दुपारी साडेबारा अशी ठेवायला हवी.
– संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी
पालकांचे म्हणणे
तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची शाळा ही दुपारीच असावी. वयाने लहान असलेल्या मुलांना शाळा आणि शिक्षकांशी जुळवून घ्यायला आणि शिक्षणाची आवड लागायला वेळ लागतो. त्यामुळे मुलांची झोप पूर्ण झाल्यानंतर ते शाळेत गेल्यावर त्यांना शिक्षणाची गोडी लागेल आणि वर्गात लक्ष लागेल.
– प्रणिता बनकर, पालक
वयाने लहान असणाऱ्या मुलांची शाळा सकाळी असायला हवी. त्यामुळे मुलांना सकाळी लवकर उठायची सवय लागते. झोपून उठल्यावर मुले उत्साही असतात. त्यामुळे गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात आणि विविध कृती, खेळ खेळण्यात ते पुढाकार घेतात.
– वर्षा लिमये, पालक
सकाळी भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करावा का?
‘सकाळी लवकर शाळा नको, मुलांची झोप होऊ द्यावी’ हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शाळेच्या वेळेत बदल होणे गरजेचे आहे का? आणि हा बदल का करावा? याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
Users Today : 24