पुणे – देशभरात नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या येरवडा येथील इझी-पे प्रा.लि. कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक केली.
उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी (वय ३६) आणि आयुब बशिर आलम (दोघे रा. गया, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इझी-पे प्रा.लि. कंपनीचे देशभरात नोंदणीकृत एजंटांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. या कंपनीतील नोंदणीकृत एजंटांपैकी ६५ जणांनी संगनमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अॅपव्दारे कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले होते.
आरोपींनी अनधिकृत मोबाईल संचांद्वारे कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला. तसेच कंपनीच्या खात्यामधून एजंटच्या कमिशनव्यतिरिक्त तीन कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांची रक्कम इतर ४४ बँक खात्यांत जमा करून फसवणूक केली. याबाबत पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपी अंकित कुमार अशोक पांडे (रा. पश्चिम बंगाल) आणि छोटू ऊर्फ एजाज आलम (रा. गया, बिहार) यांना यापूर्वी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून पुणे सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. परंतु आरोपी दिल्ली, बिहार येथून पश्चिम बंगाल येथे गेल्याचे समजले.
पोलिसांनी त्याचा माग काढत उबेद अन्सारी आणि आयुब बशिर आलम या दोघांना कोलकतामधून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलिस अंमलदार संदेश कर्णे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, शाहरूख शेख, नीलेश लांडगे, नितीन चांदणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Users Today : 19