नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेयो) संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम तसेच ६१५ खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासनाने ५७५ कोटी ७९ लक्ष १७ हजार ४९७ रुपयांच्या निधीस राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे ५ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय सादर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे प्रस्तावित काम नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यासही शासनाने मान्यता दिली. विशेष असे की, डॉ. आंबेडकर रुग्णालय उत्तर नागपुरातून हलविण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यामुळे उत्तर नागपुरातच हे रुग्णालय उभारण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयासाठी निधीला मान्यता देण्यात आली आहे. यावरून हे रुग्णालय उत्तर नागपुरातच तयार होईल, असे सूतोवाच करण्यात आले.
Users Today : 24