पुणे – देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांची सुमारे पाच हजार कोटींची फसवणूक करणाऱ्या समृद्धी जीवन घोटाळ्यातील फरारी आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सातारा रस्ता परिसरात अटक केली.
रामलिंग हिंगे (वय ५६, रा. गोकुळनगर, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. समृद्ध जीवन समूहाचा सर्वेसर्वा मुख्य आरोपी महेश मोतेवार आणि रामलिंग हिंगे यांनी समृद्ध जीवन फूड्स इंडिया आणि समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या देशभरात शाखा उघडल्या. या माध्यमातून त्यांनी गुंतवणूकदारांची चार हजार ७२५ कोटी रुपयांची फसवणूक केली.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंगे फरार झाला होता. मागील सात वर्षांपासून तो पुण्यात ओळख लपवून राहत होता. हिंगे सातारा रस्त्यावरील सिटी प्राइड सिनेमागृहाजवळ येणार असल्याची माहिती सीआयडीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला शिताफीने अटक करण्यात आली.
समृद्ध जीवन समूहाविरुद्ध देशभरात २६ गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी देशातील ६४ लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. त्यात महाराष्ट्रातील १८ लाख गुंतवणूकदारांचा समावेश आहे. या गुन्ह्यांतील २५ आरोपींपैकी महेश मोतेवारसह १६ जणांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
‘सीआयडी’चे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार सुनील बनसोडे, प्रदीप चव्हाण, कोळी यांनी ही कारवाई केली.
Users Today : 22