मिरज : जिल्ह्यातील संवेदनशील आणि दाट लोक वस्तीच्या मिरज शहरात देशभरातील संवेदनशील घटनांचे कायम पडसाद उमटण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शहर पोलिसांना कायम सतर्क राहावे लागते. यामुळे शहराच्या मध्यभागी उभारलेले मिरज शहर पोलिस ठाणे कायम व्यस्त पोलिस ठाणे म्हणून परिचित आहे.या पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्याबळ लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे आहे. मात्र, येथे वर्षभरात अनेक उत्सव, उरूस, जुलूस, संगीत सभा आणि राजकीय सभांचा अतिरिक्त ताण पोलिसांवर असतो. याकामी बहुतांश पोलिस कर्मचारी बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. २००९ च्या घटनेनंतर जिल्ह्यात हे पोलिस ठाणे संवेदनशील म्हणून ओळखले जाते. यामुळे पोलिसांकडून रूट मार्च, कोबिंग ऑपरेशन, वेळोवेळी नाकाबंदी केली, यामुळे गुन्हेगारी आटोक्यात आहे. तसेच या पोलिस ठाण्याला मुख्य शहरासह कृष्णाघाट रोड, वड्डी, बेडग, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, कळंबी या सात गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांपर्यंतचे कार्यक्षेत्र आहे.
मिरज पोलिस ठाण्याचे महात्मा गांधी पोलिस ठाणे आणि मिरज शहर पोलिस ठाणे अशा स्वतंत्र विभाजनानंतर शहर पोलिसांचा अतिरिक्त कमी झाला आहे. वर्षभरात सरासरी ३०० गुन्ह्यांची येथे नोंद आहे. यामध्ये चालू वर्षात खुनासारख्या एक दोन घटना घडल्या आहेत; तर खुनाच्या प्रयत्नांच्या ३ घटनांची पोलिस दप्तरी नोंद आहे. वर्षभरात सावकारीचे २ गुन्हे येथे दाखल आहेत.
Users Today : 29