चाकण : येथील एका बांधकाम व्यवसायिकाने जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर सोमेश्वर मंदिराजवळ मराठी शाळेसमोर लोखंडी पत्राची काही शेड रस्त्याजवळ उभारली आहेत ती अनाधिकृत आहेत. त्या व्यवसायिकाने त्या जागेला पत्रे लावले होते आणि त्यामध्ये आत पत्र्याची शेड उभारली होती.
त्यानंतर बाहेरील पत्रे काढून टाकले आणि शेड आज समोर आली. या जागेत अनाधिकृत शेड बांधण्यात आलेली आहेत.त्याबाबत संबंधित जागा मालक,बांधकाम व्यवसायिकाला नोटीस देण्यात आलेली आहे. अशी माहिती चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी दिली.
चाकण,ता.खेड येथे अनाधिकृत बांधकामामुळे बकालपणा वाढतो आहे. बोटावर मोजता येणारी अधिकृत बांधकामे आहेत. अनाधिकृत बांधकामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. व्यवसायिकांनी बांधकाम प्रकल्प,कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारल्यानंतर ओपन स्पेसही खाल्ले आहेत.त्या जागेवर पत्र्याची शेड भाड्याने गाळे देण्यासाठी उभारली आहेत.
ही पत्र्याची शेड अनाधिकृत आहेत. ती दहा बाय दहा, दहा बाय पंधरा अशी पत्र्याची शेड उभारायची त्याच्यातून दर महिन्याला लाखो रुपयांचे भाडे कमवायचे असा बांधकाम व्यवसायिकांनी काही तसेच जागा मालकांनी धंदा मांडला आहे.
नगर परिषदेचे नियम पादळी तुडवून चाकण मध्ये असे प्रकार सर्रास करण्यात येत आहेत . याकडे चाकण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे असा आरोप नागरिकांचा आहे.चाकण शहरातील मुख्य जुन्या पुणे -नाशिक रस्त्याच्या कडेला सिटी सर्व्हे नं -632 मध्ये या बांधकाम व्यवसायिकाने, जागा मालकाने पत्र्याच्या शेडमध्ये अनेक गाळे काढले आहेत.
हे गाळे भाड्याने देऊन पैसे कमवायचे हा त्याचा उद्देश आहे.चाकण येथील रस्त्यावर कोणीही येते आणि कोणीही लोखंडी पत्र्याचे शेड बेकायदा अनाधिकृत उभे करते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व इतर समस्या होतात.
हा रस्ता वर्दळीचा आहे. फुटपाथही काही जागा मालकांनी, पथारीवाल्यांनी गिळून टाकले आहेत. या रस्त्यावर मराठी शाळा आहे. तेथे शाळा सुटल्यानंतर तसे शाळा भरताना विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होते.
चाकण शहराचे बकालीकरण काही बांधकाम व्यवसायिकांनी, काही जागा मालकांनी केल्यामुळे नागरिकांनी नापसंती तसेच नगरपरिषदेच्या कारभाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.अगोदरच हा रस्ता अरुंद त्यात या बांधकाम व्यवसायिकाने पत्र्याची शेड उभारली त्यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी ये -जा कशी करायची, वाहने कशी न्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी सांगितले की, संबंधीत व्यक्तीला, जागा मालकाला आज नोटीस देण्यात आलेली आहे. ही सर्व लोखंडी पत्राची शेड अनाधिकृत आहेत.विनापरवाना उभारण्यात आलेली आहेत. त्यांचा पंचनामा करण्यात येणार आहे.
या जागेवर नगरपरिषदेने विकास आराखड्यात काही आरक्षण यापूर्वी टाकले होते. त्याबाबत संबंधित जागा मालकाने न्यायालयात धाव घेतलेली आहे. तेथील निर्णय अद्याप झाला नाही.त्या जागेवर अनाधिकृत पत्र्याची शेड उभारली आहेत हे चुकीचे आहे. त्या व्यक्तीला नगरपरिषदे ला लेखी खुलासा करण्यास सांगितले आहे. असे मुख्याधिकारी बल्लाळ यांनी सांगितले.
Users Today : 25