.अखेर कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षिततेवर DGCA कडून शिक्कामोर्तब; आता प्रतिकूल परिस्थितीतही झेपावणार विमान

Khozmaster
2 Min Read

उजळाईवाडी : येथील कोल्हापूर विमानतळावरील (Kolhapur Airport) विमान संचलनासाठीच्या सुरक्षिततेच्या भक्कमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील पाच वर्षांसाठी सर्व प्रकारच्या हवामानामध्ये विमानांच्या संचालनासाठी आवश्यक कोड ‘थ्री-सी ऑल वेदर’ (आयएफआर) या वर्गातील ‘डीजीसीए’च्या एअरोड्रोम परवान्याचे यशस्वीरीत्या नूतनीकरण करून विमानतळाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.हा परवाना विमानतळावर प्रतिकूल परिस्थितीतील विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी महत्त्वपूर्ण आहे. आयएफआर म्हणजे भौतिक दृश्य संदर्भांऐवजी सुरक्षितपणे उपकरणांच्या साहाय्याने विमानांचे यशस्वी लँडिंग व टेकऑफ होते.

हा परवाना सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीमध्ये ‘इन्स्ट्रुमेंट फ्लाईट रुल्स ऑपरेशन्स’साठी कोड ‘थ्री-सी’ एअरोड्रोम म्हणून देण्यात आला आहे. या प्रकारातील परवान्या अंतर्गत १२०० ते १८०० मीटर दरम्यान धावपट्टीची लांबी आवश्‍यक असते आणि २४ ते ३६ मीटर दरम्यान पंख असलेल्या विमानांना येथे हाताळता येऊ शकते. कोल्हापूर विमानतळ धावपट्टीची लांबी सध्या १९७० मीटर असून ६४ एकर भूसंपादनानंतर धावपट्टीची लांबी २३०० मीटर पर्यंत होणार आहे.

हा परवाना सर्व हवामानातील ‘आयएफआर ऑपरेशन्स’साठी जारी केला आहे; परंतु केवळ रन वे २५ (मुडशिंगीच्या दिशेने) नाईट लॅडिंगपुरता मर्यादित आहे. याउलट पश्चिम दिशेकडील रन वे क्रमांक ०७ फक्त दृश्य उड्डाण नियम अर्थात दिवसा ऑपरेशन्ससाठी उपलब्ध असेल, कारण एअरफिल्डच्या पश्चिमेकडील (कळंबा) दिशेकडून विमान उतरण्याच्या व उड्डाणाच्या मार्गावर अडथळे आहेत.

थेट पाच वर्षांसाठी नूतनीकरण

यापूर्वी परवान्याचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण केले जात होते; परंतु डीजीसीएने यावेळी पाच वर्षांसाठी वैध अर्थात १४ डिसेंबर २०२८ पर्यंत परवाना जारी केला आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणि डीजीसीए सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंटस्‌नुसार सुरक्षिततेचा उच्च दर्जा राखण्यासाठी २०१३ पासून सतत काम केले आहे.कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांना २०१३ पासून उच्च सुरक्षा मानकांबरोबरच सर्वोत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी विमानतळाच्या विस्तारीकरण व विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, पाच वर्षांसाठी ‘आयएफआर’ परवान्याचे नूतनीकरण हा एक महत्त्वाचा टप्पा प्राप्त झाला आहे.

0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *