कुडित्रे : उसाचा (Sugarcane) उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी (Farmer) मेटाकुटीला आला असताना, ऊसतोड मजूर शेतकऱ्यांची लूट करत आहेत. एका साडग्याला, ट्रॉलीला बाराशे रुपये ते पंधराशे रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात. शेतकऱ्यांची ही अडचण पाहून म्हारुळ (ता. करवीर) येथील ऊसतोडपे मजूर टोळीने शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेता ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे.या तरुणांचा, तोडप्यांचा आदर्श निर्माण झाला असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. गावागावात तरुण साखर कारखान्याला ऊसतोडणीचे काम करू लागले आहेत. या हंगामात सुरुवातीपासूनच टनाला शंभर रुपये, एका ट्रॉलीला बाराशे रुपये ते पंधराशे रुपये शेतकऱ्यांकडून घेत आहेत. शेतकरी ऊसतोड होऊ दे किंवा मनुष्यबळ नसल्यामुळे या ऊस तोडणाऱ्या टोळीला पैसे देतात.एका एका शेतकऱ्याचे हजारो रुपये घेऊन एक टोळी तीन महिन्यांत लाखो रुपये कमवत आहे. ऊस उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतकऱ्यांची ही अडचण पाहून म्हारुळ येथील तरुणांनी एक ऊसतोड टोळी केली. गेली दोन वर्षे ते ऊस तोडणीचे काम करतात. शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी एक रुपया सुद्धा ते घेत नाहीत. चहासुद्धा देऊ नका म्हणतात आणि उसाचे वाढे सुद्धा योग्य पद्धतीने तोडतात.यामुळे या तरुणांच्या मागे शेतकरी आपला ऊस तोडावा म्हणून विनवणी करता करत आहेत. दरवर्षी ही टोळी १००० टन ऊस तोडते. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाचतात. या ऊस तोडपे टोळीमध्ये विश्वास पाटील, कृष्णात पाटील ,बाजीराव चौगले, दीपक पाटील ,राजाराम चौगले, ओमकार चौगले ,गजानन पाटील,बाजीराव चौगले या तरुणांचा समावेश आहे.
Users Today : 30