पुणे जिल्ह्यातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणी (ता. आंबेगाव) येथील जैन मंदिरात श्री. श्रेयांसनाथ भगवानच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण जिल्ह्यातून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. विश्वकल्याण सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेने येथील पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. पंचक्रोशीत प्रथमच असे चौमुखी जिनालयाची निर्मिती करण्यात आली आहे मंदिराचे संपूर्ण काम संगमरवरी दगडात राजस्थानी कारागिरांनी केले आहे.
पद्ममणी पंचतीर्थामध्ये पाबळ, लोणी, कवठे, केंदुर व वाफगाव येथील मंदिरांचा समावेश होतो. प.पु.आचार्य श्री यांच्या प्रेरणेने पंचतीर्थांचा विकास होत आहे.या अंतर्गत लोणी येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे अशी माहिती श्री. श्रेयांसनाथ मुर्तीपूजक संघाने दिली.
यानिमित्त आयोजित अंजनशलाका, मुर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन व ध्वजारोहन आदी कार्यक्रम संपन्न झाले. या कालावधीत संगीत भजन, वरघोडा, अभिषेक, शांतीपुजा आदी धार्मिक कार्यक्रम झाले.
श्री. श्रेयांसनाथ भगवानच्या अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी ग्रामभोजन ( महाप्रसाद) चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाबळ, संविदणे, राजगुरुनगर, कवठे, शिरूर, आळेफाटा, पारनेर, मुंबई, नाशिक येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.