Nagpur News : राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सरकार १ रुपयात विमा उतरविल्याचे ढोल वाजवत आहे; पण, यासाठी ८ हजार १५ कोटींचा हप्ता भरला आहे. मात्र, १३८९ कोटी रुपयांचाच विमा शेतकऱ्यांना मिळाला असल्याचे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
वडेट्टीवार म्हणाले, ‘‘राज्यातील शेतकरी पीककर्ज परत करू शकत नाही. कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही. नाशिक पट्ट्यात पाऊस झाला असून, द्राक्षाचे पीक वाया गेले आहे. तिथेदेखील शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको सुरू केला आहे. शेतकरी रस्त्यावर बसला आहे.’’ या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी स्थगनप्रस्तावाद्वारे विधानसभेत केली; परंतु, ती फेटाळण्यात आल्याने विरोधी पक्षाने सभात्याग केला.
सरकारने एक रुपयाचा विमा उतरविल्याचा फायदा केवळ विमा कंपन्यांना होणार आहे. काही शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला परवानगी मागितली, तरी सरकारला जाग येत नाही, याचे आश्चर्य वाटते.
शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : अंबादास दानवे
मागील आठ दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले असून हवालदील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शुक्रवारी (ता.८) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
विधान परिषदेत दानवे यांनी या मुद्द्यावरील चर्चेत संभाजीनगर, जळगाव, पालघर, नागपूर, हिंगोली, नांदेड व नाशिकसह अनेक जिल्ह्यांत मोठया प्रमाणात गारपीट व अवकाळीने नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
यात द्राक्ष, कलिंगड, संत्री, मोसंबी, टोमॅटो व कापसाचे नुकसान झाले असून सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ती नेमकी कोणत्या नुकसानासाठी आहे याबाबत स्पष्टता नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सावरकर अवमानप्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून निषेध
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा पुढे करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केले.
त्यावरून आज सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून सत्ताधाऱ्यांनी खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. या वेळी आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान हा समस्त देशभक्तांचा अपमान आहे.
त्यांचे बलिदान कोणीही नाकारू शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा गौरव केला आहे. असे असताना, काँग्रेस आणि खर्गे हे वारंवार सावरकर यांना बदनाम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे.’’ या आंदोलनात शेलार यांच्यासह राणा जगजितसिंह पाटील, सीमा हिरे, हरिभाऊ बागडे, राम कदम, समीर मेघे, नमिता मुंदडा, मोनिका राजळे यांनी भाग घेतला.
Users Today : 30