अकोला : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना अकोल्यात घडली आहे. नॅचरोपॅथी व योगाचे प्रमाणपत्र असलेल्या डॉक्टरने मुळव्याधीचं ऑपरेशन करून रुग्णांची फसवणूक केल्याचा प्रकार अकोल्यात उघडकीस आलाय. या डॉक्टरविरुद्ध वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून बोरगांव मंजू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अँलोपॅथीची परवानगी नसतानाही डॉक्टर अँलोपॅथीची प्रॅक्टीस करत होता. डॉ. एस.एस. बॅनर्जी उर्फ प्रोबीर संतोष सरकार असं या आरोपीचं डॉक्टरचे नाव आहे. तो मुळचा पश्चिम बंगालचा आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली पवार यांच्याकड़ं चौकशी सोपवली. डॉ. पवारांनी तक्रारदारांची विचारपूस केली असता डॉक्टरनं प्रत्येकाकडून ३५ हजार रुपये घेऊन मूळव्याध बरे करतो म्हणून ऑपरेशन केले असल्याचे समजले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली पवार यांनी डॉ. एस. एस. बॅनर्जी याच्या फिजिशियन दवाखान्यात पाहिले, नॅचरोपॅथीक व योगाचे तो प्रमाणपत्र असतांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करताना दिसून आला. त्याच्याकडे बॉम्बे नर्सिंग अॅक्ट अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रही नाही. त्यानंतर अॅलोपॅथीची परवानगी नसताना प्रॅक्टीस करता येत नाही, असा सविस्तर चौकशी अहवाल जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवला.
त्यांच्या आदेशावरून या तोतया डॉ. एस.एस. बॅनर्जी उर्फ प्रोबीर संतोष सरकार याच्याविरूद्ध बोरगाव मंजू पोलिसांत डॉ. रूपाली पवार यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी कलम ३३ महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसायी अधिनियम १९६१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून तोतया डॉक्टर बॅनर्जी हा फरार आहे, अशी माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप पळसपगार यांनी दिली आहे.
Users Today : 23