पिंपरी : कार्तिकी एकादशीनिमित्त ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू,’ या भावनेने आलेल्या असंख्य भाविकांच्या गर्दीने शनिवारी अलंकापुरी गजबजली होती. सर्वत्र सुखनामाचा गजर चालू होता. इंद्रायणी नदी तीरावर वैष्णवांचा मेळा आनंदाने नाचत होता.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा १२ डिसेंबरपर्यंत साजरा होणार आहे. या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात मोठे महत्त्व आहे. ‘यात्रे अलंकापुरी येतील, ते आवडती विठ्ठला,’ या संतवचनाची आठवण मनात बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवर हरिनामाचा गजर चालू आहे. ठिकठिकाणच्या धर्मशाळांमध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात स्वच्छता
‘स्वकाम सेवा मंडळा’च्या स्वयंसेवकांनी मंदिर आणि परिसरात अहोरात्र स्वच्छता केली. याशिवाय विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने भाविकांच्या दर्शनबारीत पिण्याचे पाणी, अन्नदान, आरोग्य तपासणी, मोफत औषधवाटप या सेवा देण्यात आल्या. इंद्रायणी तीरावर जलप्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात आली.आडे दाम्पत्याला दुसऱ्यांदा मान
यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील परतवाडी गावच्या शेषराव सोपान आडे आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई या दाम्पत्याला मिळाला. त्यांना २०२१मध्येही हा मान मिळाला होता. ‘माउलींच्या कृपेमुळे सेवेची संधी मिळाली,’ अशी भावना आडे दाम्पत्याने व्यक्त केली. ‘सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे,’ अशी मागणी माउलींच्या चरणी केल्याचे आडे यांनी सांगितले.
सोमवार (११ डिसेंबर) कार्यक्रमाची रूपरेषा
पहाटे ३ ते ४ : पवमान अभिषेक, दुधारती
पहाटे ५ ते ९.३० : भाविकांच्या महापूजा
सकाळी ९ ते १२ : संजीवन समाधी सोहळा कीर्तन
दुपारी १२ ते १२.३० : घंटानाद, पुष्पवृष्टी
दुपारी १२.३० ते १ : श्रींना महानैवेद्य
सायं. ६.३० ते ८.३० : देहूकरांतर्फे कीर्तन सेवा
रात्री ८.३०नंतर : धुपारती, भजन, जागर